मुंबई -राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात असल्याने येत्या ७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मंदिरांसह सर्वधर्मिय धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार मुंबईत मंदिरांच्या आतील भागातील क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत व कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर मंदिरे सुरु करण्यास पालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. याबाबत नियमावली जाहीर केली असून, तसे परिपत्रक पालिकेने काढले आहे.
क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती -
राज्यात कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने मागील आठवड्यात येत्या ७ ऑक्टोबरपासून मंदिर आणि धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे मागील काही महिन्यांपासून मंदिरात दर्शनासाठी जाणा-या भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी संकट कायम असल्याने परवानगी देताना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही परवानगी देताना आपआपल्या कार्यक्षेत्रात कोरोनास्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्य़ाचे अधिकार राज्य सरकारने दिले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रासाठी नियमावली जाहीर केली आहे. धार्मिक स्थळांवर एकूण क्षमतेच्या फक्त ५० टक्के उपस्थिती ठेवता येणार आहे. सॅनिटायझेशन, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टनसिंग बंधनकारक राहणार आहे. धार्मिक स्थळांमध्ये भाविकांना मूर्त्यांना तसेच धार्मिक ग्रंथाना हात लावण्याची परवानगी नसेल. या नियमावलीचे पालन करणे संबंधितांना बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्या्न, आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.