महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून पेच, मुंबई महापालिकेची डोकेदुखी वाढणार - दसरा मेळावा वाद

उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्हीकडून दसरा मेळाव्याला परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई महापालिकेकडे करण्यात आली आहे Dussehra Melava 2022. सध्या या दोन्ही अर्जावर पालिकेने निर्णय घेतला नाही. तरी येत्या काळात निर्णय घेताना पालिकेची डोकेदुखी वाढणार आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर अर्जावर योग्य तो निर्णय घेऊ असे पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे पालिका सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.

दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून पेच
दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून पेच

By

Published : Sep 5, 2022, 7:01 PM IST

मुंबई - शिवसेनेचा गेले ५६ वर्षे दसरा मेळावा होतो. यापैकी कोरोनाची दोन वर्षे सोडल्यास हा मेळावा दादर शिवाजी पार्क मैदानात होत आला आहे. यंदा शिवसेनेत फूट पडली आहे. यामुळे उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्हीकडून दसरा मेळाव्याला परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई महापालिकेकडे करण्यात आली आहे. सध्या या दोन्ही अर्जावर पालिकेने निर्णय घेतला नाही. तरी येत्या काळात निर्णय घेताना पालिकेची डोकेदुखी वाढणार आहे.

दसरा मेळावा वाद -दादर शिवाजी पार्क येथे गेले ५६ वर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता त्यावेळी असे. बाळासाहेबांच्या निधनानंतरही शिवसेनेचा दसरा मेळावा ठरल्याप्रमाणे होत आहे. २०१२ नंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यापूर्वी मेळाव्यासाठी परवानगीचा अडथळा कधीही समोर आला नाही. त्याची चर्चाही झालेली नाही. यावेळी मात्र राजकीय समिकरण बदलले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर राजकीय चित्र बदलून गेले आहे. फुटलेला शिंदे गट आपण शिवसेनाच असल्याचा दावा करीत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून परवानगीसाठी अर्ज केल्यावर शिंदे गटात सामिल झालेले स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे अर्ज केला आहे. २२ ऑगस्टला शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी उद्धव ठाकरे गटाकडून तर ३० ऑगस्ट रोजी सदा सरवणकर यांनी शिंदे गटाकडून अर्ज केला आहे. या दोन्ही अर्जावर पालिकेने निर्णय घेतलेला नाही. पालिकेने कोणालाही परवानगी दिली तर दुसरा पक्ष कोर्टात जाणार असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढणार आहे. तसेच राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे.


कसा घेतला जाऊ शकतो निर्णय -पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज आल्यावर त्याची शहानिशा केली जाते. एकाचवेळी दोन अर्ज आल्यास पहिल्या अर्जाचा विचार केला जातो. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी पालिकेकडे सध्या दोन अर्ज आले आहेत. पालिकेत आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. प्रशासक हे थेट नगरविकास विभागाच्या अखत्यारीत काम करतात. नगर विकास विभाग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे पालिका आयुक्त आणि अधिकारी मुख्यमंत्री यांच्या दबावाखाली एकनाथ शिंदे गटाला परवानगी देऊ शकतात. असे झाल्यास उद्धव ठाकरे गट कोर्टात जाऊ शकतो असे पालिकेतील वरिष्ठ पत्रकार सुनील शिंदे यांनी सांगितले.


तर कोर्टात जाऊ -दरवर्षीप्रमाणेच यंदाही दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला आहे. शिवसेनेमध्ये कोणतेही गटतट नाहीत. एकच शिवसेना आहे. एक नेतृत्व, एक मैदान, एक झेंडा, एक विचार हे यंदाच्या दसरा मेळाव्याचे घोषवाक्य आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मार्गदर्शन करतील. आम्हाला परवानगी दिली नाही तर कोर्टात जाऊ, असे शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी संगितले.

काँग्रेसमध्ये असताना अर्ज केला होता का - शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळाव्याला एक मोठा इतिहास आहे. शिंदे गटाला काय इतिहास आहे? जेव्हा सरवणकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा त्यांनी अर्ज का केला नव्हता अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी दिली आहे.

दाबावाखाली काम करू नका -दसरा मेळावा हे ५६ वर्षाचे रेकॉर्ड आहे. त्यात कोणीही असे तसे घुसू शकत नाही. शिवसेना कोणाची हा कोर्टात विषय आहे, त्याचा पालिकेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे दबावाखाली आहोत असे दाखवून पालिकेने कामे करू नयेत. दरवर्षी ज्याप्रमाणे परवानगी दिली जाते त्याप्रमाणे परवानगी दिली पाहिजे. सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे हे सक्षम अधिकारी आहेत. ते नक्की याच्यावर विचार करतील. पालिका आयुक्तांनी यावर लवकर पडदा पाडावा अशी विनंती पेडणेकर यांनी केली आहे.

योग्य तो निर्णय घेऊ - सध्या मुंबईतील गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडणे हे आमचे प्राधान्य आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर अर्जावर योग्य तो निर्णय घेऊ असे पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे पालिका सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.

हेही वाचा - उद्धव ठाकरे यांनी आम्हाला फसवले; लालबाग राजा दर्शनानंतर अमित शाह यांची ठाकरेंवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details