मुंबई -मध्य रेल्वेने एका खासगी कंपनीच्या मदतीने ‘कन्वर्सेशन ऑन द मूव्ह’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये प्रवाशांना मेल-एक्सप्रेसच्या रेल्वे गाडीत एक क्यूआर कोड उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. हा क्युआर कोड प्रवाशांनी आपल्या मोबाईलवर स्कॅन केल्यावर, एक चॅटबोटद्वारे प्रवास आणि प्रवासाची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना सहप्रवाशांना माहिती विचारण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे रेल्वे प्रवास आणखी समृद्ध होणार आहे.
आणखी १० एक्स्प्रेसमध्ये सुरु होणार उपक्रम - मध्य रेल्वे नेहमीच प्रवासी केंद्रीत आणि नवीन उपक्रमांसाठी ओळखली जाते. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापरासाठीची प्रवाशांची आवड प्रशासन लक्षात घेते. त्यामुळेच प्रवासादरम्यान प्रवाशांना नवीन काळातील संवादात्मक अनुभव देण्यासाठी नॉन-फेअर रेव्हेन्यू अंतर्गत मध्य रेल्वेने भागीदारी केली आहे. गुपशुपच्या जागतिक दर्जाच्या संवादात्मक प्रतिबद्धता उपायांचा वापर करून, मध्य रेल्वे प्रवास अधिक समृद्ध केला आहे. मध्य रेल्वेने डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये एका खासगी कंपनीच्या मदतीने हा उपक्रम सुरू केला आहे.
कशी असेल मध्य रेल्वेची सुविधा - रेल्वे गाडीत एक क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा क्युआर कोड प्रवाशांनी आपल्या मोबाईलवर स्कॅन केल्यावर, चॅटबोट सुरु होतो. या चॅटबोटद्वारे प्रवास आणि प्रवासाची संपूर्ण माहिती मिळते. त्याशिवाय पुस्तके, हॉटेल, गेम्स या सारख्या अनेक सेवेचा आनंद प्रवाशांना घेता येतो. सध्या या उपक्रमला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने आणखी १० एक्स्प्रेस गाड्यांमध्ये हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे चॅटबोट - रेल्वे डब्यात लावण्यात आलेल्या क्युआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन केल्यानंतर एक चॅटबोट सुरु होतो. या चॅटबोटमध्ये तुमच्या प्रवासाविषयी अधिक माहिती उपलब्ध होते. विशेषतः प्रवाशांच्या मार्गावरील काही महत्त्वाच्या स्थानकांची सखोल माहिती मिळू शकते. या तपशीलांमध्ये भेट देण्याची ठिकाणे, खरेदी, जेवण, कपडे, आणि बरेच काही समाविष्ट आहे. याशिवाय या चॅटबोटमध्ये प्रेमकथा, पौराणिक कथा, रामायण, महाभारत आणि इतर लोककथांमधील छोट्या, न ऐकलेल्या कथा प्रवाशांना याद्वारे समजतील. या सर्व गोष्टींसाठी, चॅटबोट प्रवाशांच्या आवडीच्या कोणत्याही भाषेत माहिती देऊ शकते.