मुंबई- कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पडला असतानाच, उद्यापासून (२५ मे) देशांतर्गत विमान वाहतुकीला सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. याबाबत राज्याचे अल्पसंख्यांक व कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मुंबईत प्रत्येकी २५ विमानांचे रोज लँडिंग आणि टेकऑफ होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासोबतच, यासंबंधीच्या सूचना आणि इतर माहिती लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी राज्यातील जनतेला संबोधित करताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीन पुरी यांच्यासोबत आपण फोनवर चर्चा केली असल्याचे सांगत देशांतर्गत विमान वाहतुकीवर निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या चर्चेनंतर सरकारने आपली भूमिका बदलली असल्याने उद्यापासून मुंबईत विमान वाहतुकीला सुरूवात होणार आहे. ही वाहतूक सुरूवातीला २५ विमानांपर्यंत असली तरी गरज आणि परिस्थिती लक्षात घेऊन त्यात वाढ केली जाईल, असेही मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.