मुंबई -शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) लोकनेते आहेत. त्यांच्यावरती कोणी दावा सांगू शकत नाही, अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Shinde group spokesperson Deepak Kesarkar ) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना फटकारले. तसेच सातत्याने न्यायालयाची पायरी चढणाऱ्या शिवसेनेला सबुरीचा सल्ला दिला.
शिवसेना हिसकवण्याचा प्रयत्न-पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) जनतेला भावनिक करण्यापेक्षा शिंदे गटाच्या ( Eknath Shinde ) तीन प्रश्नांची उत्तरे द्यावी, अशी मागणी केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यात भाजपसोबत सेनेच्या बंडखोर नेत्यांचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना, शिंदे गट असा वाद रंगला आहे. शिंदे गटाकडून सातत्याने आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत, असा दावा केला जातो आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांवर सडकून टीका करताना, ठाकरेंविना शिवसेना करण्याचा बंडखोर नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या विरोधात आपल्याला लढायचा आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव वापरू नये स्वतःच्या आई वडिलांची नावे वापरून निवडणुकीला सामोरे जावे असे विधान केले होते.
आमच्या तीन प्रश्नाची उत्तरे द्या - शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वरती बोलणार नाही. ते आम्हाला आदरणीय आहेत. मात्र, जनतेच्या मनात गैरसमज होऊ नये, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, एकनाथ शिंदे यांना आपण मुख्यमंत्री बनवण्याची तयारी होते का? स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी चर्चा केली नव्हती का? या शिंदे गटाच्या तीन प्रश्नांची उत्तरे मागितली होती. मात्र, त्यांना उत्तरे न देता, आमच्या वरती सातत्याने टीका सुरू आहे. खासदार आमदारांच्या, घरावर मोर्चे काढले जातात, घोषणाबाजी सुरू आहे, हा प्रकार महाराष्ट्राला अशोभनीय आहे.
लोकांना खोटं सांगू नका -लोकांना भावनिक करून शिवसैनिकांची दिशाभूल करू नका. पक्षप्रमुख आजारी होते, म्हणून आम्ही हे षडयंत्र केले असे, लोकांना सांगितले जात आहे. हे सगळं चुकीच आहे. लोकांना खोटं सांगू नका, असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले. बाळासाहेबांनी ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण करण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केली. हेच तत्व घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीची चर्चा सुरू होती. भाजपच्या १३ आमदारांच्या निलंबनानंतर ती फिस्कटली. आता महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी केली जातेय, असा आरोप सुरू आहे. जेव्हा पंतप्रधानांसोबत चर्चा सुरू होती, तेव्हा मुंबई मराठी माणसांसाठी का मागितली नाही? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.