मुंबई - मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधीत प्रकरणांचा तपास करण्यासाठी आता विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. उपायुक्त दर्जाचे अधिकारी या एसआयटीचे प्रमुख आहेत. तर, सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी एसआयटी'चे प्रमुख तपास अधिकारी असतील, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मुंबईत दाखल दोन गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंग यांच्या सहभागाबाबत ही एसआयटी तपास करणार आहे. हे प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकारी व बड्या व्यक्तींच्या संदर्भातील असल्यामुळे तपासावर त्याचा परिणाम होऊ नये. तसेच, विशिष्ठ वेळेत या प्रकरणांचा तपास होण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. ही एसआयटी थेट सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील व पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना रिपोर्ट करणार असल्याचेही वरिष्ठ अधिऱ्याने सांगितले आहे.
मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल
परबीर सिंग यांच्याविरोधात पहिले प्रकरण मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल आहे. ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक शामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. फिर्यादी शामसुंदर अग्रवाल हा असून, ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक आहे. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 387, 388, 389, 403, 409, 420, 423, 464, 465, 467, 468, 471, 120(ब), 166, 167, 177, 181, 182, 193, 195, 203, 211, 209, 210, 347, 109, 110, 111, 113 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.