मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रातील 'पी 305' या बार्जवरील 84 जणांचा मृत्यू झाला. तर 188 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आतापर्यंत केवळ 2 लाखांची मदत देण्यात आली आहे. मात्र मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 75 लाखांची मदत देण्यात यावी, अशी मागणी फॉरवर्ड सिमेंस युनियनकडून करण्यात आली आहे.
'ओएनजीसी'चे 3 अधिकारी निलंबित
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून, या समितीच्या प्राथमिक चौकशीत 'ओएनजीसी'च्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत 'ओएनजीसी'च्या या संबंधित तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
75 लाखांच्या मदतीची मागणी
फॉरवर्ड सीमेन युनियनचे सेक्रेटरी अक्षय बिरवाडकर यांच्या दाव्यानुसार 'पी 305' बार्ज वर झालेल्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. मात्र या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना कायदेशीररित्या योग्य ती मदत मिळाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेरीटाइम लेबर कनवेनशन 2006 नुसार भारतामध्ये या कायद्याचे गॅझेट झालेले आहे. शिपिंग हा आंतरराष्ट्रीय व्यवसाय असून, यातील सर्व कायदे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर बनविण्यात येतात. या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे भारताकडून गॅजेट स्वरुपात रुपांतर करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येते. या कायद्याच्या अनुषंगाने 1 लाख 4 हजार डॉलर बेसिक वेतन हे कामगारांना मिळायला हवे. या निर्णयाच्या अनुषंगाने पी 305 व टग बोट वरप्रदा या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत व जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना 75 लाख रुपये नियमानुसार मिळायला हवेत असं अक्षय बिरवाडकर यांनी म्हटलं आहे.
'पी 305' बार्ज दुर्घटना, मृतांच्या नातेवाईकांना 75 लाखांची मदत देण्याची मागणी दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू
अरबी समुद्रात चक्रीवादळात ज्यावेळेस ही घटना घडली होती, त्यावेळेस भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची व आयएनएस कोलकाता या दोन युद्धनौकेच्या माध्यमातून शोध व बचाव कार्य हाती घेण्यात आले होते. यामध्ये तब्बल 188 जणांना सुखरूप वाचण्यात आले होते. आतापर्यंत 84 जनांचा यामध्ये मृत्यू झालेला असून, यामधील पी 305 बार्ज वर 73 जण तर टग बोट वरप्रदाच्या 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बचाव व शोध कार्यादरम्यान 6 मृतदेह हे रायगड मधील समुद्र किनारी आढळून आले, तर 8 मृतदेह हे गुजरातच्या समुद्रकिनारी मिळून आले होते. दरम्यान या शोध व बचाव कार्यासाठी नौदलाच्या विशेष डायव्हरची ही मदत घेण्यात आली होती.
हेही वाचा -जीएसटी परिषद : कोरोना लशींवरील जीएसटी दर 'जैसे थे'; उपकरणांवरील करात कपात