मुंबई -शहरात गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. मात्र गर्दीवर नियंत्रण नसल्याने कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेने ३० एप्रिलपर्यंत सकाळी जमावबंदी आणि रात्री संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लावण्यात आला आहे. तर शुक्रवारी रात्री ८ ते सोमावरी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुंबईत रुग्णांना ऑक्सिजनची आणि रेमडीसीवरची कमतरता नाही अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
86 हजार 279 सक्रिय रुग्ण
मुंबईत सुमारे दीड कोटी नागरिक राहतात. त्यापैकी 4 लाख 91 हजार 698 कोरोनाचे रुग्ण आहेत. मृतांचा आकडा 11 हजार 874 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 92 हजार 514 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 86 हजार 279 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 71 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 750 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 44 लाख 54 हजार 140 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
'हे' विभाग हॉटस्पॉट
मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.
आयसीयू, व्हेंटिलेटरची संख्या कमी
मुंबईत ८ एप्रिलच्या आकडेवारीनुसार जंबो कोविड आणि कोविड सेंटरमध्ये एकूण २३ हजार १८१ खाटा आहेत. त्यापैकी १८ हजार ४२ खाटांवर रुग्ण आहेत. तर ५ हजार १३९ खाटा रिक्त आहेत. पालिका, सरकारी, खासगी रुग्णालयात १७ हजार ४९१ खाटा आहेत. त्यापैकी १३ हजार ८०२ खाटांवर रुग्ण असून ३ हजार ६८९ खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या १० हजार ६७६ खाटा असून त्यापैकी ८ हजार ७६२ खाटांवर रुग्ण असून २ हजार ५ खाटा रिक्त आहेत. २ हजार ८०७ आयसीयूच्या खाटा असून त्यापैकी २ हजार १२ खाटांवर रुग्ण असून ७२ आयसीयू रिक्त आहेत. व्हेंटिलेटरच्या १ हजार १७९ खाटा असून त्यापैकी १ हजार १५१ खाटांवर रुग्ण असून ५८ व्हेंटिलेटर रिक्त आहेत.
रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर हे इंजेक्शन महत्त्वाचे आहे. या इंजेक्शनचा २२ हजाराचा साठा पालिकेकडे आहे. आणखी २५ हजाराचा साठा मागवण्यात आला आहे. तर आणखी २ लाख इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे. मुंबईत पालिका आणि कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन पुरवठा करता यावा यासाठी मोठे टॅंक लावण्यात आले आहेत. तसेच इतरही ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था आहे. आधी मुंबईत एक एजन्सी ऑक्सिजनचा पुरवठा करत होती. आता तीन एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे ऑक्सिजनचा साठा सुरळीत होत आहे.
ट्रेन, बस, टॅक्सी, रिक्षा, पार्सल सेवा सूरू
मुंबईत सकाळी जमावबंदी आणि रात्री नाईट कर्फ्यू सुरू आहे. शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत विकेंड कर्फ्यू आहे. या दरम्यान ज्यांच्याकडे फूड लायसन्स आहे अशा हॉटेल रेस्टोरंटमधून शुक्रवार ते सोमावर सकाळपर्यंत पार्सल मागवता येईल. रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत ट्रेन, बस, टॅक्सी आणि रिक्षा सुरु राहतील. यामधून अत्यावश्यक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करता येईल. तसेच ज्या नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर जायचे आहे त्यांना मोबाइलवर मॅसेज आले असल्यास त्यांना लसीकरण केंद्रावर जाण्यास परवानगी आहे.