मुंबई -शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक वरळी विधानसभा हा मतदारसंघ आहे. शिवसेनेचा गड असलेल्या वरळीमधून २००९ची विधानसभा निवडणूक सोडली तर सातत्याने शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आहे. त्यात आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करीत असल्याने साहजिकच हा मतदारसंघ शिवसेनेसाठी त्यांच्या राजकारणातील केंद्रबिंदू ठरला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या मतांची टक्केवारी जास्त आहे. या मतदारसंघातून शिवसेनकडून सध्याचे आमदार सुनील शिंदे किंवा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यापैकी कोणीही निवडणूक लढवली तरी विजय शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास येथील शिवसेना पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा... विधानसभेत 'वाघ-सिंह' एकत्र; मुख्यमंत्र्यांकडून युतीचे संकेत
शिवसेना नेते दत्ताजी नलावडे यांनी सातत्याने चार वेळा वरळी मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र २००९ मध्ये मात्र कुख्यात गुंड आणि माजी आमदार अरुण गवळी यांचे भाचे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी ५२ हजार ३९८ मते मिळवत शिवसेनेच्या आशीष चेंबूरकर यांना पराभूत केले. चेंबूरकर यांना ४७ हजार मते मिळाली होती. २००९ च्या विधानसभेतील यशानंतर अहिर यांनी वरळी मतदारसंघात चांगलीच लोकप्रियता मिळविली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत येथून ते पुन्हा निवडून येतील, अशी हमखास खात्री शरद पवार यांनाही होती. मात्र, शिवसेनेच्या सुनिल शिंदे यांनी अहिर यांच्यापेक्षा दुपटीने मते घेत त्यांचा पराभव केला.
सुनिल शिंदे यांनी १९८५ पासून शिवसेनेचे उप शाखा प्रमुख म्हणून पक्षात कामाला सुरुवात केली. २००७ मध्ये त्यांनी सर्वप्रथम नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेश केला. मात्र २००९ मध्ये त्यांच्याऐवजी पक्षाने आशीष चेंबूरकर यांना उमेदवारी दिली. चेंबूरकर यांचा पराभव करून अहिर निवडून आले. मात्र त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुनिल शिंदे यांनी अहिर यांचा पराभव केला.