महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराष्ट्राचे सिंहासन... कोणाला मिळणार जनतेचा आशीर्वाद?

राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या वर्षी होत असलेली ही विधानसभा निवडणूक अनेक अंगाने महत्वपूर्ण अशी आहे. राज्याच्या 60 वर्षांच्या राजकीय इतिहासात एखाद्या गैरकाँग्रेसी सरकारने आपला कार्यकाल पूर्ण केल्यानंतर निवडणुकीला सामोरी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत असलेल्या राज्याच्या राजकीय परिस्थितीचा घेतलेला आढावा.

महाराष्ट्राचे सिंहासन

By

Published : Sep 27, 2019, 3:59 PM IST

Updated : Sep 27, 2019, 5:42 PM IST

मुंबई -राज्यातील जनता या वर्षी, विधानसभेसाठी आपले जनप्रतिनिधी निवडून देणार आहेत. राज्यात अनेक पक्ष या रणधुमाळीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी उतरले आहे. यातील काही पक्ष हे राज्याच्या राजकारणात केंद्र स्थानी आणि काही परिघावर आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे? तसेच सांख्यिकीय बाबींचा विचार करता कोणता पक्ष किती जोरदार मुसंडी मारेल याचे विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न...

राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने माहीत असाव्यात अशा सात ठळक बाबी

1 ) सुमारे 12 कोटी लोकसंख्या असलेले महाराष्ट्र (राष्ट्रीय लोकसंख्येपैकी 10%) हे लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेशानंतर (17%) देशातील दुसर्‍या क्रमांकाचे राज्य आहे. तसेच विधानसभा जागांचा विचार केल्यास उत्तरप्रदेश (403), पश्चिम बंगाल (294) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, तर लोकसभा सदस्यांच्या बाबतील उत्तर प्रदेश (80) खालोखाल महाराष्ट्राचा (48) महाराष्ट्राचा नंबर लागतो. यामुळेच राज्याप्रमाणेच राष्ट्रीय राजकारणावर देखील महाराष्ट्राची छाप पडते.

2) 2020 या वर्षी राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव साजरा करणारे महाराष्ट्र राज्य कित्येक वर्ष काँग्रेस या पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. 60 वर्षांच्या राज्यातील एकूण राजकीय इतिहासात 1995 साली सेना भाजप युतीचे पहिले गैरकाँग्रेसी सरकार स्थापन झाले, मात्र दोन मुख्यमंत्री राहिलेल्या या सरकारचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहिला नाही, तर 6 महिने अगोदरच राज्यात निवडणूका झाल्या. यानंतर 2014 साली भाजप आणि शिवसेना यांच्याच युतीचे गैरकाँग्रेसी सरकार पुन्हा राज्यात आले. या सरकारने आपला 5 वर्षांचा कार्यकाळ आता पुर्ण केला आहे, यामुळेच आगामी निवडणुकीतही आपण पुन्हा जिंकू हा विश्वास त्यांना वाटत आहे.

हेही वाचा... विधानसभेत 'वाघ-सिंह' एकत्र; मुख्यमंत्र्यांकडून युतीचे संकेत

3) राज्यातील सद्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक राजकीय विश्लेषक, प्रसारमाध्यमे आणि सर्वसामान्य लोकांनाही देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा राज्यात येऊ शकेल, असा विश्वास वाटत आहे. हा विश्वास वाटण्यास काही आकडेवारी देखील कारणीभूत ठरते आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप यांच्या युतीला राज्यात साधारणतः 50% पेक्षा अधिक मते मिळाली आहेत. तसेच 230 विधानसभा जागांवर युतीच्या उमेदवारांचीच आघाडी असल्याचे दिसून आले होते. याचाच अर्थ लोकसभेप्रमाणेच युतीची कामगिरी राहिल्यास आगामी विधानसभेतही युतीला साधारणतः 230 म्हणजे एक चतुर्थांश जागा मिळण्याची शक्यता आहे. असे यश आजपर्यंतच्या इतिहासात काँग्रेसलाही क्वचितच मिळालेले दिसते.

4) 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप हे वेगवेगळे लढले होते. 1999 पासून सत्तेत असलेले, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि 25 वर्षांची युती असलेल्या शिवसेना भाजप या चारही पक्षांनी स्वबळाचा नारा देत, 2014 ची विधानसभा लढवली होती. यात सर्वात जास्त यशस्वी ठरला तो भाजप. 2014 च्या मोदी लाटेचा राज्यातील भाजपला पुरेपुर फायदा झाला. इतिहासात प्रथम भाजपने 123 जागा जिंकल्या, तर इतर 40 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. 2009 च्या विधानसभेतील 77 जागांच्या तुलनेत भाजपला 2014 ला मिळालेले हे घवघवीत यश होते. यानंतरही राज्यात झालेल्या पंचायती, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकात भाजप हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष राहीला आहे. यामुळे 2019 च्या लोकसभेचे यश पाहता आणि राज्यातील भाजपची वाढलेली तारद पाहता, आगामी विधानसबेत भाजप साधारणतः 288 पैकी 155 पेक्षा जास्त जागा मिळवत स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल, असा विश्वास राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थीतीचा घेतलेला आढावा

हेही वाचा... मुंबईत कोणाला किती जागा? आढावा...

5) राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्या पक्षाचे आव्हान टिकवण्यासाठी विशेष पुढाकार घेतलेला दिसतो. याच प्रयत्नातून 2014 ला आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला दुर लोटल्यानंतर आज त्याच पक्षासोबत निवडणकांच्या 2 महिने अगोदरपासूनच समजोता केला आहे. आघाडीतील विधानसभांच्या जागांच्या वाटपाबाबत उभय पक्षातील अनेक नेते हे, नाराज असलेले पाहायला मिळत असले, तरीही सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पातळीवर झालेल्या या वाटाघाटी अजूनही कायम असलेल्या दिसतात. मागील 6 महिन्यांच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी या उभय पक्षांनी पक्षीय स्तरावर अनेक चढउतार पाहिले आहेत. या पक्षातील साधारणतः 30 पेक्षाही अधिक आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत सेना अथवा भाजपात प्रवेश केला आहे. यामुळेच अगोदरच कमकुवत झालेल्या या पक्षांची आगामी विधानसभेतील लढाई कशी असेल, हे पाहणे मनोरंजक ठरेल.

6) या लेखाची मांडणी करत असेपर्यंत शिवसेना आणि भाजप यांच्यात विधानसभेसाठी युती झाली आहे की नाही, हे अजून स्पष्ट झालेले दिसत नाही. याचे कारण एकीकडे आघाडीने जागावाटपाचे सुत्र जाहीर केले असतानाही, युतीकडून अद्याप अशी कोणतीही आकडेवारी देण्यात आलेली नाही. मात्र उभय पक्षातील शिर्षस्थ नेते आणि इतर नेत्यांकडून मात्र युती होणार असल्याचे ठासून सांगण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र पक्षाची ताकद सर्वाधिक असताना भाजपच्या अनेक नेत्यांना खरे तर युती करी नये असे वाटत आहे. जर मतदानानंतर गरज पडली तर सरकार स्थापनेसाठी सेनेला सोबत घेता येईल, असा मतप्रवाह भाजपमध्ये बळावतो आहे. याउलट शिवसेनेला मात्र एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणे जड जात असल्याचे दिसत आहे. मात्र, आता शिवसेनेनेही हळूहळू एकटे लढण्याची चाचपणी करण्यास सुरुवात केलेली दिसत आहे.

हेही वाचा... जागतिक पर्यटन दिन विशेष : वैभवशाली वारसा असलेला अतुलनीय भारत !

7) राज्यात आता विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांवर मतदान, मतमोजणी येऊन ठेपली आहे. परंतु सर्व पक्षांकडून प्रचार जोरदार सुरू असलेला दिसत आहे. मात्र या सर्व परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सर्वात जास्त चर्चेचा विषय हा, युती होईल की नाही? हा बनलेला आहे. यामुळे राज्याचे भविष्य ज्यावर अवलंबून आहे., अशा प्रश्नांवर मात्र चर्चा होताना दिसत नाही. आज अर्ध्या राज्यात पूर व पूरपूर्वोत्तर परिस्थिती आहे, मराठवाड्यातील दुष्काळ, ग्रामीण भागातील बहुतेक भागातील शेती संकट, शहरी बेरोजगार किंवा बेरोजगारांमधील अशांतता अशा अनेक महत्वाच्या बाबी मात्र या राजकीय कोलाहलात मागे पडत आहेत.

2014 च्या निवडणूकीवर एक दृष्टीक्षेप

एकूण जागा - 288

पक्ष विजयी जागा मिळालेल्या मतांची टक्केवारी

पक्ष विजयी जागा मिळालेल्या मतांची टक्केवारी
भाजप 122 27.8 %
शिवसेना 63 19.30%
काँग्रेस 42 18%
राष्ट्रवादी 41 17.2%
मनसे 1 3.1%

हेही वाचा... ईडी कार्यालयात जाणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शरद पवारांचा निर्णय मागे

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षांना मिलालेल्या जागा आणि मतदानाची टक्केवारी

एकूण जागा - 48

पक्ष जिंकलेल्या जागा मतांची टक्केवारी
भाजपा 23 27.59
शिवसेना 18 23.29
काँग्रेस 01 16.27
राष्ट्रवादी 04 15.52
इतर 02 17

हेही वाचा... शरद पवारांची एक रॅली अन् सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर?​​​​​​​

विचारात घ्याव्यात अशा काही ठळक बाबी

अ) भाजप आणि शिवसेना यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या होत्या., मात्र 2019 ची लोकसभा त्यांनी एकत्रीत लढवली होती.

ब)2014 पासून भाजपची मतांची टक्केवारी ही कायम राहिल्याची दिसते, याउलट युतीत पुन्हा आल्याने शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. (जवळपास पाच टक्क्यांची वाढ) अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजप यांनी एकत्र येत राज्यातील साधारणतः 50 टक्क्यांहून अधिकची मते मिळवली आहेत.

क) काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2014 मध्ये स्वतंत्रपणे लढल्यानंतर 2019 च्या लोकसभेसाठी पुन्हा एकत्र आले होते. मात्र गेल्या पाच वर्षात त्यांच्या मतांचा टक्का घसरलेला दिसत आहे.

राज्याची विधानसभा निवडणूक ही त्या राज्यातील राजकारणाचा धावणीचा काळ असतो. मात्र या काळात राजकारणाबरोबरच राज्यातील अनेकाविध प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षीत असते, महाराष्ट्रात सध्या असे काही होताना दिसत नाही. राज्यात अनेक गंभीर प्रश्न आ वासून असताना, राजकीय वर्तुळात मात्र त्यांचे स्थान दुय्यम असलेले दिसत आहे. हे राज्याच्या प्रागतिक स्वरूपाचे लक्षण असू शकत नाही. यामुळे विधानसभेच्या रणधुमाळीनंतर तरी हे प्रश्न केंद्रस्थानी येतील अशी अपेक्षा आहे.

Last Updated : Sep 27, 2019, 5:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details