मुंबई- आमदार सरदार तारासिंग आणि मुलुंड हे समीकरण इतके घट्ट आहे की, ते सोडवणे अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला जमलेले नाही. गुजराती बहुल मतदारसंघ असूनही पंजाबी असलेले तारासिंग येथून निवडून येत आहेत. मागील 20 वर्षांपासून सरदार तारासिंग मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मोठ्या संख्येने गुजराती मतदारांनी मनोज कोटक यांच्या पारड्यात मतदान केले होते. या विभागाची परिस्थिती पाहता विद्यमान आमदार वयोवृद्ध झाले. त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. या विभागातील आमदारकीचे मुख्य दावेदार समजले जाणारे कोटक खासदारकीची लॉटरी लागल्याने भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारीसाठी अंतर्गत चढाओढ सुरू झाली आहे. भाजपकडून कुणाला संधी मिळणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे
हेही वाचा - प्रतिष्ठित अशा 'आयबीसी' पुरस्कारावर 'ईटीव्ही भारत'ची मोहर!
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या मुलुंड मतदारसंघामध्ये उच्चभ्रू, मध्यम आणि गरीब अशी लोकवस्ती आहे. गुजराती, मराठी आणि उत्तर भारतीय अशी चेहरेपट्टी मुलुंडला आहे. पूर्वेकडील नवघर, मिठागर, गव्हाणपाडा, निर्मलनगरपासून पश्चिमेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मुलुंड कॉलनीपर्यंत असा भाग या विधानसभा क्षेत्रात येतो. 2014 च्या निवडणुकीत तारासिंग यांना 90 हजार पेक्षा जास्त मतदान झाले होते. विकास काम न करता सिंग हे खासगी इमारतींना आमदार फंडातून पेव्हर ब्लॉक लावून देतात हा विकास आहे का?असा आरोप विरोधकांकडून होतो. मात्र, असे असताना देखील त्यांना हरवणे विरोधकांना शक्य झाले नाही. सिंग यांचे कट्टर विरोधक काँग्रेसचे चरण सिंग सप्रा या वेळी निवडणूक लढवणार नसून त्यांच्या जागी काँग्रेस दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेत असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. सिंग यांची लढाई विरोधकांकडुन नसून त्यांची लढाई ही स्वतःच्या पक्षातील लोकांबरोबर असणार आहे.