मुंबई -एसटी संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई (ST Workers Suspended) झाली आहे, त्या सर्व निलंबित कर्मचाऱ्यांना एक संबंधी म्हणून सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांनी केली होती. मात्र, आज प्रत्यक्षात निलंबित करण्यात आलेल्या दहा हजार कर्मचाऱ्यांपैकी फक्त १४९ कर्मचारी हजर झालेले आहेत. तर ६८ हजार १७८ कर्मचाऱ्यांची अजूनही संपात सहभागी आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून उद्यापासून महामंडळ संपात सहभागी कामगारावर कोणती कारवाई करते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आज फक्त दीड कर्मचारी हजर -
एसटी महामंडळाला शासनात विलीन करा, या प्रमुख मागीवरून गेल्या एका महिन्यापासून एसटी कामगारांचा संप सुरू आहेत. या संपाच्या अनुषंगाने परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी महामंडळाचा अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन जे कामगार आजपर्यंत नियमबाह्यरित्या आंदोलनात सहभागी झाले किंवा ज्या कामगारांना संपकाळात निलंबित केलेले आहेत. त्यांना मानवतावादी दृष्टीकोनातून, कर्तव्यावर हजर होण्यासाठी अखेरची संधी देण्याबाबतची घोषणा केलेली आहे. त्यानुसार सोमवारपर्यत हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुजू करुन घेण्यात यावे, असे लेखी आदेश एसटी महामंडळाने सर्व विभागाला दिले होते. मात्र, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचे चित्र दिसून आले आहे. प्रत्यक्षात आज निलंबित करण्यात आलेल्या दहा हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांपैकी फक्त १४९ कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळ संप फोडण्यात अपयशी ठरले आहे.