मुंबई -विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यात दरेकर ( Pravin Darekar ) यांना न्यायालयाकडून अंतरिम दिलासा देण्यात आला आहे. पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.
आज याचिकेवर सुनावणी दरम्यान प्रवीण दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी युक्तिवाद करत असताना न्यायालयासमोर, मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा वर्ष 1997 मधला आहे. राज्य सरकारने केलेली कारवाई राजकीय सूड बुद्धीतून करण्यात आली आहे, असे सांगितले.
मुंबै बँक कथित घोटाळा प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्यावर (Case Registered Against Pravin Darekar) फॉर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. काल बुधवार (दि. 16 मार्च) रोजी दरेकर यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावनी झाली, त्यावेळी ही याचिका फेटाळून लावत अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
अटक न करण्याची मागणी फेटाळली
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई उच्च न्यायालयाने काल (Bombay High Court) दिलासा देण्यास नकार दिला. दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळण्याची मागणी केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यात दरेकरांना अटक न करण्याची मागणी फेटाळली आहे. (Mumbai Bank Case Darekar) त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानुसार दरेकर यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली.