मुंबई - महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांनी शिवसेनेबाबत मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते फडणवीस शिवसेनेसोबत आमचे शत्रुत्व कधीच नव्हते, असे सांगत स्वॉफ्ट कॉर्नर घेत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ही युतीची तर नांदी नाहीना असे बोलले जात आहे.
फडणवीस यांची भाषा बदलली
राज्य विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी जवळीक साधत सत्ता स्थापन केली. पहाटेच्या या शपथविधीचा शिवसेनेला मोठा हादरा बसला. शिवसेना-भाजपमधील २५ वर्षांची युती तुटली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. राज्यातील सरकार दोन दिवसांत कोसळल्याने, भाजपच्या जिव्हारी लागले. शिवसेनेमुळे विरोधी बाकावर बसावे लागल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षभरापासून शिवसेनेला झोडपून काढले. मात्र, आता फडणवीस यांची भाषा आता बदलू लागल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यातच फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.त्यानंतर आता फडणवीस यांची शिवसेनेबाबत मवाळ भूमिका निर्माण झाली आहे. त्यामुळे फडणवीस यांनी वरिष्ठांकडूनच शिवसेनेसोबत जूळवून घेण्याच्या सूचना झाल्या असू शकतात अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा शिवसेनेबाबत सॉफ्ट कॉर्नर? 'आमच्यात वैचारिक मतभेद'
निवडणूकीमध्ये ज्या पक्षाने आमचा हात धरून विरोधी पक्षाविरोधात निवडणूक लढवली, तीच शिवसेना निवडणूकीनंतर मात्र विरोधकांचा हात धरून गेली. त्यामुळे आमच्यात आणि शिवसेनेत शत्रूत्व नाही, पण वैचारिक मतभेद आहेत असे फडणवीस यांनी सांगताना, आगामी काळात शिवसेनेसोबतच्या युतीबाबत काळ पाहून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. तसेच, शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे आशीष शेलार यांच्यात झालेली भेट ही माझी मुलाखत घेण्यासाठीची तयारी झाली असावी, असे म्हणाले. त्यामुळे शिवसेनेवर टीका करणारे फडणवीस अचानक कसे काय गोड बोलू लागले, असा सवाल उपस्थित होतो आहे.
'आठवले म्हणाले माझं ऐकलं असतं तर..'
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यामध्ये एक विधान केले आहे. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपची ताटातूट झाली आणि पुढे जाऊन सेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आपला नवा संसार थाटला. सत्तासंघर्षाच्या याच काळात मी फडणवीसांना सल्ला दिला होता. शिवसेनेला अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद देऊन टाका. त्यावेळी माझे म्हणणे फडणवीसांनी ऐकले असते तर ते आज मुख्यमंत्री असते, असं आठवले म्हणाले. आठवले एवढेच बोलून थांबले नाहीत. तर, तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असंही त्यावेळी मी सांगितले होते, अशी आठवणही आठवलेंनी यावेळी सांगितली. रामदास आठवले यांनीही ऐकले असते, तर ते आज मुख्यमंत्री झाले असते असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लगावला.
राज्यात भेटीगाठी वाढल्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जून महिन्यात राज्याचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते. या शिष्टमंडळाने मोदींशी पावणेदोन तास चर्चा केली. या पावणेदोन तासातील अर्धा तास मोदी-ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना या एकांतातील भेटीबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा मी मोदींनाच भेटायला गेलो होतो. नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो, असे उत्तर दिले. मोदी आणि आमचे नाते घट्ट असल्याचेही ते म्हणाले होते. तर, संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यातदेखील शनिवारी भेट झाली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना उधान आले आहे.