मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी करण्यासाठी लसीकरण केले जात आहे. या लसीकरणादरम्यान गेल्या चार महिन्यांत मुंबईमध्ये ३० लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी ७ लाख ३८ हजार ७१३ नागरिकांनाच लसीचा दुसरा डोस देण्यात आले आहे. यामुळे सुमारे १ कोटी ३० लाख मुंबईकर नागरिकांपैकी फक्त ७ लाख ३८ हजार जणांनाच कोरोनापासून सुरक्षीत करण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे.
७ लाख ३८ हजार नागरिकच सुरक्षीत
मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु आहे. या मोहिमेदरम्यान केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. प्रत्येक नागरिकांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. लसीचे दोन डोस दिल्यावर नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. यानुसार मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण ३० लाख १४ हजार ७४३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी २२ लाख ७६ हजार ३० लाभार्थ्यांना पहिला, तर ७ लाख ३८ हजार ७१३ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. याचाच अर्थ मुंबईमधील १ कोटी ३० लाख नागरिकांपैकी फक्त ७ लाख ३८ हजार ७१३ जणांनाच कोरोनापासून सुरक्षीत करण्यात महापालिकेला यश आले आहे.
लसीचा तुटवडा, ग्लोबल टेंडर
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु आहे. या लसीकरणादरम्यान पालिकेने लसीचा पुरवठा किती होणार याकडे लक्ष न देता, हवी तशी खासगी लसीकरण केंद्रांना मंजुरी दिली. तसेच महापालिकेने देखील लसीकरण केंद्रे सुरू केली. याचा परिणाम म्हणून नागरिकांनी लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद दिला. दिवसाला ४० ते ५० हजार लाभार्थ्यांना लस दिली जात होती. मात्र मागणी एवढे लसीचे उत्पादन होत नसल्याने, लसीचा तुटवडा जाणवू लागला. लसीचा तुटवडा असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली. लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पालिकेने १ कोटी लसीसाठी ग्लोबल टेंडर मागवले आहे. त्याला दोन वेळा मुदतवाढ दिली असून, ८ पुरवठादारांनी प्रतिसाद दिला आहे.
30 लाख 14 हजार 743 लाभार्थ्यांना लस