मुंबई -मुंबईतील नालेसफाईवरून पालिकेवर दरवर्षी टीका होते. ही टीका होऊ नये म्हणून पालिकेने यंदा नालेसफाई पारदर्शक करण्यावर भर दिला आहे. नालेसफाईचे ऑनलाइन ट्रॅकिंग केले ( Online tracking of Nalesafai in Mumbai ) जाणार आहे. त्यासाठी पालिकेने नाळेसफाईची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी पालिकेने डॅशबोर्ड बनवला आहे.
45 टक्के नालेसफाई पूर्ण -दरवर्षी मुंबईतील नदी नाल्यांमधून साचलेला गाळ पावसाळ्यापूर्वी काढून मुंबई बाहेरील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. मोठ्या नाल्यातुन जवळपास 4 लाख 63 हजार मॅट्रिक टन तसेच छोट्या नाल्यातून व पावसाळी गटारातून 4 लाख 24 हजार मॅट्रिक टन गाळ काढला जातो. इतर गाळ मिळून पालिका यावर्षी 9 लाख 7 हजार 160 मॅट्रिक टन गाळ काढणार आहे. या एकूण गाळापैकी 75 टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढण्यासाठी पालिका प्रयत्नशील असते. यंदा नालेसफाईच्या कामाला उशिराने सुरुवात झाली. आतापर्यंत 45 टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. 30 मे पर्यंत 100 टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे असा दावा पालिकेचे पायाभूत सुविधेचे उपायुक्त उल्हास महाले यांनी प्रशासनाच्या वतीने केला आहे.