महाराष्ट्र

maharashtra

एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन आजच, दिवाळीसाठी अग्रिम रक्कम तात्काळ देणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन आजच, दिवाळीसाठी अग्रिम रक्कम तात्काळ देणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा

By

Published : Nov 9, 2020, 3:37 PM IST

Published : Nov 9, 2020, 3:37 PM IST

Updated : Nov 9, 2020, 4:26 PM IST

Anil Parab
अनिल परब

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे वेतन काही तासात जमा होणार. थकीत दोन महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी जमा होणार. थकीत वेतन व विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आज राज्यभर कुटुंबीयांसह आक्रोश आंदोलन सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याची दखल घेत आज एक महिन्याचा पगार व दिवाळीला मिळणारी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दिवाळीला दुसऱ्या महिन्याचा पगार देऊ, असे पत्रकार परिषद घेत सांगितले.

परिस्थिती खराब असल्याने वेतन थकले

अनिल परब म्हणाले की, एसटीची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने वेतन थकले आहे. आम्ही खूप प्रयत्न करतोय जिथून जिथून पैसे उपलब्ध होतील, तेथून पैसे जमा करतोय. बँकेकडून व राज्य सरकारकडे आम्ही मदत मागितली आहे. हळूहळू महामंडळाची परिस्थिती सुधारेल.

आत्महत्या करू नका, हे संकट तात्पुरते आहे -

एसटी कर्मचाऱ्यांनो आत्महत्या करू नका, हे तात्पुरते संकट आहे. आपण नक्की मार्ग काढू. दुःखी होऊन टोकाचा निर्णय घेऊ नका, माझी विनंती आहे. मी सर्व पूर्वपदावर आणेन असे आवाहन देखील अनिल परब यांनी केले आहे.

विरोधी पक्ष टीका करतंय, जरा अभ्यास करून टीका करा -

एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रोश आंदोलनावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारने लवकर निर्णय घ्या, नाहीतर आम्ही टोकाची भूमिका घेऊ असे म्हटले, तसेच भारतीय दंड संहितेनुसार एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली म्हणून परिवहनमंत्र्यांवर कारवाईची मागणी केली. त्यावर अनिल परब म्हणाले, लागलं तर कर्ज काढेन कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, पण कर्मचाऱ्यांचं चांगलं करेन. तसेच प्रवीण दरेकर यांनी भारतीय कलमांचा नीट अभ्यास करावा नंतर बोलावे, असे देखील परब यांनी म्हटले.

अर्णब गोस्वामी प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत -

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर व त्यांना मिळालेल्या कस्टडीबद्दल बोलताना अनिल परब म्हणाले, की अर्णब गोस्वामी हे कोर्टाच्या प्रक्रियेत आहेत. त्यात पोलीस आणि राज्य सरकार काही बोलू शकत नाहीत. कारागृहात त्यांना मोबाईल वापरायला मिळाला, याची देखील चौकशी होणार आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -

- प्रवीण दरेकर यांनी कलमांचा नीट अभ्यास करावा नंतर बोलावं

- लागलं तर कर्ज काढेन कोणाला काय म्हणायचं ते म्ह्णू द्या

- बँकेकडून व राज्य सरकारकडे मी मदत मागितली आहे

- दुःखी होऊन टोकाचा निर्णय घेऊ नका, विनंती आहे माझी मी सर्व पूर्वपदावर आणेन

- आत्महत्या करू नका, हे तात्पुरते संकट आहे, आपण नक्की मार्ग काढू

- दिवाळीत दुसऱ्या महिण्याचा पगार देऊ

- तसेच दिवाळीला मिळणारी रक्कम देखील सणापूर्वी मिळणार आहे

- कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार लगेच आता देणार

- आम्ही खूप प्रयत्न करतोय जिथून जिथून पैसे उपलब्ध होतील तेथून पैसे जमा करतोय

- एसटीची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने वेतन थकले आहे.

Last Updated : Nov 9, 2020, 4:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details