मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असताना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत सध्या संचारबंदी असली तरी लसीकरणाला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी नसली तरी लसीकरणाला एका लाभार्थ्यांला एका तासाचा अवधी लागत आहे. पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील लसीकरण केंद्रामधील सुविधांमुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
राजावाडीत लसीकरणाला एका तासाचा अवधी, चांगल्या सुविधांमुळे लाभार्थी खुश संचारबंदीतही लसीकरण - मुंबईत मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणाला सुरुवातीला थंडा प्रतिसाद मिळाला. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना झपाट्याने पसरू लागल्याने नागरिक लसीकरणाला गर्दी करू लागले. मुंबईत आतापर्यंत 18 लाखाहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबईत सध्या संचार बंदी आहे. या संचारबंदीमध्येही नागरिक लसीकरण करून घेत आहेत.
लसीकरणाला एक तास -
मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात रोज एक हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जाते. या ठिकाणी करण्यात आलेल्या सुविधेमुळे नागरिक या केंद्रावर लसीकरण करून घेण्यास गर्दी करत आहेत. यामुळे शनिवार रविवार अशा सुट्टीच्या दिवशी लसीकरण करून घेण्यास एका लाभार्थ्याला एका तासाचा अवधी लागत आहे अशी माहिती घाटकोपर येथील 66 वर्षीय मुकेश बुठा यांनी लागत आहे. बुठा यांनी आज लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांनी मुंबईत कुठेही संचारबंदी वाटत नसल्याचे म्हटले आहे. संचारबंदी वाटत नसल्याने लसीकरण केंद्रापर्यंत पोहचण्यास कोणतीही अडचण आली नसल्याचे बुठा यांनी म्हटले आहे. तर 84 वर्षीय सूर्यकांत दोशी यांनी आपल्याला लसीकरण करून घेण्यास पाऊण तास लागल्याचे सांगितले.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत कालपर्यंत एकूण 18 लाख 91 हजार 153 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 16 लाख 59 हजार 658 लाभार्थ्यांना पहिला तर 2 लाख 31 हजार 495 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 63 हजार 431 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 91 हजार 894 फ्रंटलाईन वर्कर, 7 लाख 31 हजार 692 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 6 लाख 04 हजार 136 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा -भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; विनामास्क रेल्वे प्रवास केल्यास 500 रुपयांचा दंड