मुंबई - महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटील कारस्थान जर कोणी करत असेल तर येथील स्वाभिमानी जनता त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. पण, महाराष्ट्र ज्याच्यासाठी ओळखला जातो तो सौहार्द, बंधुभाव आणि एकोप्याचे वातावरण कलुषित होऊ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी सर्व सामान्य जनता, विरोधी पक्ष आणि संघटना यांना केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. कितीही अडथळे आणि संकटे येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही आणि हे करतांना महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकाविल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न -महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरचा हा तिसरा महाराष्ट्र दिन आहे. दोन वर्ष तर देशावरच कोरोना विषाणूचे संकट होते. पण, याही आव्हानात्मक परिस्थितीत शेती, उद्योग-गुंतवणूक यामध्ये महाराष्ट्राने स्वतःला आघाडीवर ठेवले. शिवभोजनसारखी थाळी मोफत देऊन, तसेच दुर्बल, असंघटित वर्गाला आर्थिक सहाय्य करून सामाजिक भान ठेवले आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली. आरोग्य असेल किंवा सुशासन, पर्यावरण असेल किंवा नागरी विकास, महाराष्ट्राने उचललेल्या ठोस पावलांचे देश तसेच जागतिक पातळीवर पण कौतुक झाले. संकटातच खरी परीक्षा होते असे म्हणतात. त्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षात नैसर्गिक आपत्ती किंवा विषाणूच्या आक्रमणात प्रशासनाने अगदी तळागाळापासून अतिशय धीराने आणि हिमतीने काम केले. त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडा उचलून सर्वांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न फिके पडल्याचे दिसते, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राची सामाजिक वीण मजबूत -महाराष्ट्राचा इतिहास लढवय्यांचा आहे. मग मोगलांच्या आक्रमणाला थोपविणारे छत्रपती शिवराय, औरंगजेबाला ललकारणाऱ्या ताराराणी असोत किंवा सामाजिक सुधारणांसाठी आयुष्य पणाला लावणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा आणि सावित्रीमाई फुले असो. या सर्वांनी आणि त्यांना आदर्शवत मानणाऱ्या अनेकांनी जात पात धर्म याचा विचार न करता महाराष्ट्राची सामाजिक वीण मजबूत केली. या भूमीचे सुपुत्र असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना म्हणणे केवळ एक पुस्तक नाही, तर देशातील प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी एक अनमोल देणगी आहे.