मुंबई -महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांची मुदत येत्या मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र, या होणाऱ्या निवडणुकीत भाजपला एका जागेचा धोका आल्याचे सूतोवाच भाजप खासदार आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. महाविकासआघाडी एकत्रित आल्याने भाजपला त्याचा फटका बसणार आहे. मात्र मी सध्या केंद्रात मंत्री आहे. तसेच समोरून शरद पवार येत असल्याने माझी उमेदवारी निश्चित असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा...'....तर मुस्लीम आरक्षणालाच आमचा विरोध राहील'
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अॅड. माजिद मेमन यांची राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत संपत आहे. तर कॉंग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत आणि भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले आणि भाजप पुरस्कृत अपक्ष खासदार संजय काकडे यांचीही मुदत येत्या 2 मार्चला संपत आहे.
येत्या 26 मार्चला या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येकी जागेसाठी 37 मतांचा कोटा सदस्य निवडीसाठी असणार आहे. यात संख्याबळाच्या जोरावर चार जागा या महाविकास आघाडीच्या वाट्याला येऊ शकतात. दोन जागा भाजपच्या वाट्याला येऊ आहेत. त्यापैकी दोन जागा राष्ट्रवादीकडे आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
अद्याप कोणीही आपला राज्यसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.