मुंबई -मुंबईमध्ये रस्त्यावर कचरा टाकल्यास, थुंकल्यास, घाण केल्यास तसेच कोरोना काळात मास्क न घातलास क्लीनअप मार्शलकडून कारवाई केली जायची. क्लीनअप मार्शलच्या संस्थांची कंत्राटे संपल्याने आता पालिका ''उपद्रव शोधक'' म्हणजेच ''न्यूसन्स डिटेक्टर''ची ( Newsons Detector Squad ) नियुक्ती करणार आहे. यासाठी १५ संस्थांचे अर्ज आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
क्लीनअप मार्शल ऐवजी उपद्रव शोधक पथक -मुंबईमध्ये नागरिकांकडून खुलेआम रस्त्यावर कचरा टाकला जायचा, गुटका खाणारे नागरिक मिळेल त्या ठिकाणी थुंकून भिंती खराब करायचे. हे प्रकार थांबवण्यासाठी पालिकेने क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली होती. क्लीनअप मार्शलकडून दंड वसूल केला जाऊ लागल्यावर नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकणे, रस्त्यावर थुंकणे बंद केले. कोरोना प्रसाराच्या काळात जे नागरिक मास्क घालत नाहीत, रस्त्यावर थुंकतात अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार क्लीनअप मार्शलला देण्यात आले होते. त्यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभागात म्हणजेच २४ विभागात संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र कालांतराने क्लीनअप मार्शल आणि नागरिकांना यांच्यात कारवाईवरून वाद होऊ लागले. सध्या राज्य सरकारने कोरोनाच्या सर्व निर्बंधांमधून नागरिकांना मुक्त केले आहे. यामुळे मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करू नये असा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच ३१ मार्चला क्लीनअप मार्शलच्या कंत्राटचा कालावधी संपला आहे. यामुळे पालिकेने नवीन संस्थांना काम देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने क्लीनअप मार्शल ऐवजी 'उपद्रव शोधक' पथक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्याला १५ संस्थानी प्रतिसाद दिला आहे. रस्त्यावर थुंकणारे, रस्त्यावर कचरा टाकणारे, गटारात कचरा टाकणारे यांच्यावर या पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या २४ विभाग कार्यालयाच्या अखत्यारीत या पथकाची नियुक्ती केली जाणार आहे. ''उपद्रव शोधक'' पथकाला क्लीनअप मार्शलपेक्षा वेगळा गणवेश दिला जाणार आहे. अशी माहिती काकाणी यांनी दिली.