मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या असून अनिल देशमुख यांच्या 27 कंपन्यांमध्ये व्यवहार झाला असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. यासंदर्भात ईडीने आज अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स दिले आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या आणखी वाढणार अस दिसतय. दरम्यान, अनिल देशमुख यांची सुमारे 13 तास चौकशी झाल्यानंतर ईडीने त्यांना सोमवारी अटक केली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर आरोप
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंग यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर महाविकास आघाडीने परमबीर सिंग यांच्याविरोधात कारवाई सुरू केली. परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणे पोलिसांनी सिंग यांना चौकशीसाठी बोलावले, पण त्यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांनी सिंग यांच्याविरोधआत लुकआऊट नोटीस बजावली होती.
काय आहे प्रकरण ?
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे यूनिटचे हेड होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1 हजार 750 बार आणि रेस्टॉरेंट आहेत. त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात, तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते.