मुंबई -समीर वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक यांनी आज नवा खुलासा केला आहे. वानखेडे यांनी एनसीबीत आल्यापासून स्वतःची प्रायव्हेट आर्मी उभी केली असून या आर्मीच्या माध्यमातून कोट्यवधींची वसूली केली जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. वानखेडे यांच्या लाईफस्टाईलवरही मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. वानखेडे हे लाखो रुपये किंमतेचे कपडे वापरतात आणि एकदा वापरलेला शर्ट परत त्यांच्याकडे दिसत नाही, असेही मलिक म्हणाले.
देवेंद्र फडणविसांनी माझ्या जावायाच्या घरी गांजा सापडला असे म्हटले होते. मात्र, पंचनाम्यात गांजा सापडला नाही असे लिहीले आहे. तसेच न्यायालयानेही गांजा सापडला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यावर आता फडणवीस माफी मागतील का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच अनिल देशमुख आणि अजित पवार यांच्यावरील कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. काल (सोमवार) नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी मलिक यांचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, हा बॉम्ब दिवाळीनंतर फोडणार असल्याचे म्हटले होते. त्याला नवाब मलिकांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे.
काय म्हणाले नवाब मलिक -
काल माझ्यावर आरोप लावण्यात आले होते की मी या प्रकरणात महिलांचे नाव घेत आहे. पण मी फक्त या प्रकरणाशी संबंधीत महिलांचीच नावे घेतली आहे. मी इतर कोणाचेही नाव घेतले नाही. किरीट सोमैया हे रोज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ खडसे यांच्या पत्नीचे नाव घेत असतात, त्या महिला नाहीत का? असा सवाल मलिक यांनी केला.
फडणवीस माफी मागणार का?
तसेच काल फडणवीस यांनी माझ्यावर आरोप करताना, जावया विरोधातील चार्जशीटला कमजोर करण्यासाठी मलिक आरोप करत आहे, असे म्हटले होते. तसेच माझ्या जावयाच्या घरून गांजा जप्त केला, असेही म्हटले. मात्र, माझ्या जावायाच्या घरून कोणताही गांजा जप्त करण्यात आला नाही. पंचनाम्यात त्याचा उल्लेख नाही. कोर्टाच्या निकालातही गांजा सापडला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ते आता माफी मागणार आहेत का, असा प्रश्नही त्यांनी फडणविसांना विचारला.
मी गेल्या 62 वर्षांपासून मुंबईत राहतो आहे. माझे अंडवर्ल्डशी संबंध आहे, हे कोणीही म्हणू शकत नाही. जर माझे अंडवर्ल्डशी संबंध असते. तर 5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होते. गृहमंत्रालय तुमच्याकडे होते. मग तुम्ही पाच वर्ष शांत का होता, माझ्यावर कारवाई का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
फडणविसांच्या काळात मुंबई शहरातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्ट्या व्हायच्या. तिथे एका टेबलची किंमत 15 लाख होती. या पार्टीत ड्रग्जचा वापर व्हायचा. या पार्टीची आयोजक कोण होते, हे तुम्हाला माहिती नव्हतं का, असेही ते म्हणाले.
समीर वानखेडे ७० हजारांचे शर्ट आणि एक लाख रुपयांची पँट वापरतात
समीर वानखेडे जेव्हापासून एनसीबीत आले आहेत, तेव्हापासून त्यांनी एक प्रायव्हेट आर्मी तयार केली. के. पी. गोसावी, डिसूजा हे त्याच आर्मीचे मेंबर होते. एनसीबीने केस नंबर 15-2020 ही खोटी केस बनवून त्यात बॉलिवूड स्टार सारा अली खान, दीपिका पादूकोण यांना अडकवले. या केसच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपये वसूल केले, असा आरोपही त्यांनी लावला. यासोबतच समीर वानखेडेच्या शर्टची किंमत 70 हजार रुपये आहे. त्यांच्या पॅंटची किंमत 1 लाख रुपये असते. एवढे महागडे कपडे ते कसे घेऊ शकतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
समीर वानखेंडेच्या खंडणी प्रकरणात त्यांची बहिण लेडी डॉन पण सहभागी आहे. तिची देखील चौकशी करा. ज्या दिवशी वानखेडेंवर कारवाई होईल, तेव्हा त्यांचे सर्व उद्योग समोर येतील. ज्यांच्यापासून वसूली करण्यात आली त्यांनी न भीता समोर यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
परमबीर सिंह कुठे आहेत ?
अनिक देशमुखांच्या अटकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. परमबीर सिंह कुठं आहे. आरोप करून पळाले कि पळवल्या गेले, याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे. अनिल देशमुख यांनी सहकार्य केले. ते सहकार्य करायला ईडीच्या ऑफीसमध्ये गेले. मात्र, त्यांना अटक केली. हे राजकीय प्रेरीत आहे, असेही मलिक म्हणाले.
काल नवाब मलिकांनी फडणविसांवर लावले होते आरोप -
काल नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावत फडणवीस यांच्या इशाऱ्यावरच राज्यातील ड्रग्ज माफिया चालतो, असे म्हटले होते. तसेच त्यांनी जयदीप राणा आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या सोबतचा फोटोदेखील ट्वीट केला होता. जयदीप राणा हा तुरुंगात असून त्याला ड्रग्ज ट्राफिकिंगमध्ये अटक झाल्याचे मलिक यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांची पत्नी अमृता यांनी नदी संवर्धनासाठीचे गाणे गायले होते. त्या गाण्यावर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता यांनी अभिनय केला होता. त्यासोबतच तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अभिनय केला होता. त्या गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा होता, असे मलिक म्हणाले होते. फडणवीस यांच्याच काळात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाल्याचेही मलिक म्हणाले होते.
मलिकांच्या आरोपाला फडणविसांनी दिले होते प्रत्युत्तर -
दरम्यान, नवाब मलिकांनी लावलेल्या आरोपाला देवेंद्र फडणविसांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले होते. नवाब मलिकांनी दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका लावत बॉम्ब फोडल्याचा आव आणला आहे. मात्र, मलिकांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. आपल्या जावयाची चार्जशीट कमकुवत व्हावी आणि एनसीबीने दबावात येऊन आपल्या जावयाला सोडावे यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत, असे फडणवीसांनी म्हटले होते. तसेच रिव्हर मार्च या संघटनेने रिव्हर अँथम तयार केले होते. या टीममधील व्यक्तींनी आमच्यासोबत फोटो घेतले होते. चार वर्षांपूर्वीचे हे फोटो होते. त्यावरुन मलिक यांनी आम्हाला माफिया ठरवण्याचा प्रयत्न केला आहे, असे स्पष्टीकरणही फडणविसांनी दिले होते. तसेच माझ्या पत्नीसोबतचा फोटो जाणीवपूर्वक ट्विट केला, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अखेर ईडीकडून अटक, आज न्यायालयात हजर करणार