महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बार्ज पी-305 : प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळेना; मृतांच्या नातेवाईकांचा आरोप - तौक्ते चक्रीवादळ बातमी

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले पी-305 हे बार्ज समुद्रात बुडाले आहे. बॉम्बे हायजवळील या बार्जमध्ये 273 कर्मचारी अडकलेले होते.

barge p 305 accident
जेजे रुग्णालयाबाहेरील दुश्य

By

Published : May 21, 2021, 5:21 PM IST

Updated : May 21, 2021, 5:58 PM IST

मुंबई -तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले पी-305 हे बार्ज समुद्रात बुडाले आहे. बॉम्बे हायजवळील या बार्जमध्ये 273 कर्मचारी अडकलेले होते. याची माहिती मिळताच बचावकार्य सुरू झाले आणि दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांची नौदलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आतापर्यंत या घटनेमध्ये 51 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या मृतदेहांना जे जे रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आले आहे. परंतु, हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

11 मे च्या संध्याकाळी तोक्ते चक्रीवादळाच्या संकटाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. अरबी समुद्रात या चक्रीवादळाचा धोका असल्याचेही स्पष्ट केले आणि 15 मेपर्यंत समुद्रातल्या बोटींनी किनाऱ्यावर यावे अशी सूचनाही केली होती. या सूचनेनंतर जवळपास अनेक मच्छीमारी करणाऱ्या बोटी बंदरात परतल्या. मात्र, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतरही पी-305 बार्ज समुद्रात होते. हे बार्ज बॉम्बे हाय तेल क्षेत्राजवळ एका प्लॅटफॉर्मला बांधून ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे पूर्व कल्पना असूनही वेळेत या बार्जला सुरक्षित ठिकाणी न हलवल्याने ही भयंकर दुर्घटना घडली आहे.

हेही वाचा -गडचिरोलीत पोलीस-नक्षल्यांदरम्यान चकमक, 13 नक्षल्यांना कंठस्नान

दुर्घटनेच्या जबाबदारीवरून आता टोलवाटोलवी सुरू

पी-305 हे निवासी बार्ज होते. म्हणजे तेल क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय या जहाजावर करण्यात आली होती. पण त्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे यावरून टोलवाटोलवी होताना दिसत आहे. जिथे हे जहाज काम करत होतं तो प्रकल्प ओएनजीसीचा होता. मात्र, या प्रकल्पाचे कंत्राट AFCONS या कंपनीला दिले आहे. ही कंपनी शापूरजी पालनजी ग्रुपमधली कंपनी आहे. हे जहाज ड्युरामास्टर कंपनीकडून चार्टर्ड केलेलं होतं असं जाहीर केलं आहे. सागरी वाहतूक आणि तेल क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते मुख्य कंत्राटदार म्हणून प्राथमिक जबाबदारी ही ओएनजीसीला नाकारता येणार नाही.

नातेवाईकांचा प्रशासनावर आरोप

आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये जवळपास 51 जणांचा मृत्यू झाला आहे. या 51 जणांचे मृतदेह जे जे रुग्णालयाच्या शवागृहामध्ये ठेवले आहेत. या मृतदेहांची आता ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय प्रशासन काम करत आहेत. या सगळ्यांच्या कारभारामुळे मृतदेहांची ओळख पटवण्याकरता मनस्ताप झेलावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया मृतांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

हेही वाचा -येथे माणूसकी ओशाळली.. कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेऊन नातेवाईक पसार

Last Updated : May 21, 2021, 5:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details