मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील दोन दिवस कोकण विभागाचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधला आहे. तसेच अनेक ठिकाणांना भेटी देऊन तिथे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी आज (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, सुनील राणे आदी नेते होते. या भेटीत त्यांनी, 'कोकणमध्ये हेक्टरी मदतीच्या निकषामध्ये बदल करण्यात यावा. यासह मासेमारांसह शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात यावी, मासेमारी करणाऱ्यांना डिझेलचे परतावे तत्काळ देण्यात यावेत. वीज नसल्याने बँकांचे व्यवहार ठप्प आहेत, त्यामुळे तातडीची मदत रोखीने देण्यात यावी' अशा विविध 19 मागण्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनामार्फत सादर केल्या आहेत.
हेही वाचा...कोकणातील नुकसान पाहता सरकारची मदत तुटपुंजी, फडणवीसांचा आरोप
- देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनात केलेल्या मागण्या;
1) वादळ येऊन 10 दिवस झाले. तरी अद्याप कोणतीही मदत स्थानिकांपर्यंत पोहोचलेली नाही. काही ठिकाणी तर दोन बिस्किटचे पुडे आणि 3 मेणबत्त्या, अशी मदत पोहोचली आहे. जी 10 हजार रूपये थेट मदत आपण जाहीर केली आहे, ती तत्काळ लोकांना उपलब्ध करून देण्यात यावी. बँकेचे व्यवहार सुरू होत नाही, तोवर रोखीने ही मदत देण्याची व्यवस्था करण्यात यावी. यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पुराच्यावेळी अशीच मदत देण्यात आली होती.
2) शेड/पत्रे इत्यादींचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो आहे. ते नागरिकांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत.
3) अन्नधान्य हे ओले झाले असल्याने त्याला कोंब फुटलेली आहेत. त्यामुळे नागरिकांना रेशनचे धान्य तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे.
4) नागरिकांना केरोसिन (रॉकेल) उपलब्ध करून देण्यात आल्याची केवळ घोषणा करण्यात आली आहे. परंतू प्रत्यक्षात ते मिळालेले नाही. तेही तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे.
5) नागरिकांची तात्पुरत्या निवार्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीवर्धन येथे बसआगारात लोक राहत आहेत, हे फारच अमानवीय आहे. अनेक ठिकाणी छोट्या-छोट्या शाळांमध्ये लोक दाटीवाटीने राहत आहेत. कोंबून ठेवल्यासारखी त्यांची अवस्था आहे. हे अतिशय अमानवीय आहे. त्यामुळे त्यांच्या निवार्याची चांगली व्यवस्था तत्काळ उभी करण्यात यावी. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग हे एकमात्र औषध आज उपलब्ध आहे.
तात्पुरत्या निवार्यांची जागा वाढवण्यात याव्यात. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत लोक राहू शकतील, यासाठीची काळजी घेण्यात यावी. ते राहत असलेल्या ठिकाणी मास्क, सॅनेटायझर, औषधी, भोजन इत्यादींची सुविधा करून द्यावी.
हेही वाचा...महाविकास आघाडी सरकारने कोकणसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी - देवेंद्र फडणवीस
6) वीज व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. सुरू असलेल्या कामात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. नागरिकांकडून वीजेच्या खांबासाठी पैसा मागितला जात आहे. वैयक्तिक जोडणीसाठी सुद्धा पैसे मागितले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आणि संताप आहे. वीज वितरण व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यभरातून मनुष्यबळ, सामुग्री आणि कंत्राटदारांची यंत्रणा कोकणात कार्यान्वित करणे, हे फार कठीण काम नाही. ते तत्काळ करण्यात यावे.
7) मासेमार बांधवांना तातडीच्या मदतीसोबतच डिझेल परतावे तत्काळ दिल्यास त्यांच्या हाती काही पैसे उपलब्ध होतील.
8) वाड्यांमध्ये नारळ, सुपारी, आंबा इत्यादी झाडं मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली आहेत. त्यांच्या सफाईसाठी कटर्सची आवश्यकता आहे. वनविभागाचे कर्मचारी व रोजंदारी कामगार यांच्यामार्फत मनरेगाअंतर्गत ही सफाई होऊ शकेल. अर्थात यातून शेतकर्यांना सुद्धा मदत मिळेल. बरेच शेतकरी हे आंतरपीक म्हणून मसाल्याचे पीक घेतात, त्याचाही विचार मदतीच्यावेळी करावा लागेल.
9) बागायतदारांना 50 हजार रूपये हेक्टरी मदत ही अतिशय कमी आहे. आपल्याला कल्पना आहेच की, कोकणातील जमीनधारणा क्षेत्र अतिशय कमी आहे. येथील वाड्या या काही गुंठे ते 5 एकरापर्यंतच्या आहेत. त्यामुळे 500 रूपये गुंठे अशी ही मदत आहे. 2500 रूपये ते 8-10 हजार रूपयांपर्यंत फार फार तर ही मदत मिळेल. त्यापेक्षा अधिक निधी हा वाड्या स्वच्छ करण्यासाठी लागणार आहे.