मुंबई- कोरोना विषाणूचा ओमायक्रोन ( Omicronin Maharashtra ) या नवीन व्हेरियंटच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत मुंबईत 4 हजार 227 परदेशी प्रवासी आले असून त्यापैकी 19 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह ( Corona Updates in Maharashtra ) आढळून आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत करण्यात आलेल्या जिनोम सिक्वेन्सिंग ( Genome Sequencing Test ) चाचण्यांमध्ये 8 जणांना ओमायक्रॉन ( Omicron Variant) विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
19 प्रवासी कोरोनाग्रस्त -
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार सुरू झाल्याने मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. 10 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान हाय रिस्क देशातून 4 हजार 227 प्रवासी मुंबईत आले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचे व चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 19 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात 15 पुरुष तर 4 महिला प्रवासी आहे. यामध्ये 1 मॉरिशस, 3 साऊथ आफ्रिका, तर इतर युरोप आणि युके येथून आलेले प्रवासी आहेत. या पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. या सर्व पॉझिटिव्ह प्रवासी रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग तसेच एस जिन चाचणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.