मुंबई - भाजपशी ‘युती’ असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. त्यामुळे आगामी विधानसभा ‘भगवी’ करून शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना पक्षस्थापनेला १९ जून २०१९ ला ५३ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून हा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
चळवळ हाच शिवसेनेचा आत्मा -
चळवळ हाच शिवसेनेचा आत्मा आहे. या चळवळी जशा मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, हिंदूंचा स्वाभिमान यासाठी झाल्या त्यापेक्षा या चळवळी जनतेच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांवर अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीच्या काळात महागाईविरोधात लाटणे मोर्चे, पाण्यासाठी हंडा मोर्चे, गहू-तांदूळ, तेलासाठी आंदोलने झाली. ती आंदोलने आता शेतकऱ्याच्या प्रश्नांवर होत आहेत. पण त्याच्या जोडीने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी पाणीवाटप, चारा छावण्या, अन्नछत्रापर्यंत हे समाजकार्य पोहोचल्याचेही ते म्हणाले.