मुंबई - कोरोनाचे राज्यात आज एकूण 12 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 झाली आहे. त्यामध्ये 8 रुग्ण मुंबई येथील तर 2 जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी 1 रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (शनिवारी) येथे दिली. मुंबईत आढळलेल्या 8 रुग्णांपैकी 6 जणांनी परदेश प्रवास केला.
एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी आहे. तसेच आणखी एक रुग्णाने गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील कोरोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतःही बहिणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील 25 वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे.
दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक 41 वर्षाची पुण्यातील महिला कोरोना बाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोग शास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.
हेही वाचा -CORONA VIRUS : 23 मार्च रोजी होणारा दहावीचा पेपर रद्द, नवी तारीख 31 मार्चनंतर
राज्यात आज (शनिवारी) एकूण 275 परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण 1861 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 1592 जणांना भरती करण्यात आले होते. यापैकी 1208 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 64 जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे, अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून कोरोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत. त्यामुळे लोकांनी घाबरून आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आय. सी. एम. आर) प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले आहेत. तर, संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा...महाराष्ट्रासह लडाख, कर्नाटकात कोरोनाचे आणखी रुग्ण, देशाभरात २७५ जणांना बाधा
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील...
- पिंपरी चिंचवड मनपा - १२
- पुणे मनपा - ११ ( दि. २१ मार्च रोजी २ रुग्ण आढळले)
- मुंबई - १९ ( दि. २१ मार्च रोजी ८ रुग्ण आढळले)
- नागपूर - ०४
- यवतमाळ, कल्याण प्रत्येकी - ०४ (दि. २१ मार्च रोजी प्रत्येकी १ रुग्ण आढळला)
- नवी मुंबई - ०३
- अहमदनगर - ०२
- पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी १
एकूण ६४ (मुंबईमध्ये एका रुग्णाचा मृत्यू)