मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) आज रविवारी देशभरात नीट (यूजी) या सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे प्रादुर्भाव आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन दोन दिवसापूर्वी या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलण्यात आले. त्यासाठीची माहिती विद्यार्थ्यांना एनटीएकडून देण्यात आली असून विद्यार्थ्यांना दक्ष राहण्याचे कळवण्यात आले आहे.
देशभरात बदलण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना आवडीनुसार परीक्षा केंद्र निवड करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली. देशभरात ही परीक्षा 3 हजार 842 परीक्षा केंद्रावर आयोजित केली जाणार आहे. यातील सर्वाधिक परीक्षा केंद्र महाराष्ट्रात असून त्यांची संख्या 615 एवढी आहे. यातील बदलण्यात आलेल्या परीक्षा केंद्रापैकी मुंबईतील एक, नागपुर, नांदेड मधील प्रत्येकी दोन तसेच नाशिक जिल्ह्यातील देवळाली, आणि सटाणा तालुक्यातील एका परीक्षा केंद्राचा समावेश आहे.
देशभरातून नीट (यूजी) या परीक्षेला 15 लाख 97 हजार 433 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर ही परीक्षा 3 हजार 842 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षेला राज्यातून 2 लाख 28 हजार 914 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 615 परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेसाठी खबरदारी घेण्यात आली असून यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्र सॅनिटायझर करणे आणि परीक्षा केंद्रांवर दिलेल्या नियम आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत आहे का, याची तपासणी करणे आदीकडे लक्ष दिले जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जेईई-मेन या परीक्षे सोबतच रविवारी होत असलेल्या नीट (यूजी) या परीक्षेला मुंबईतील लोकल प्रवासासाठीची मुभा दिली आहे. तर विद्यार्थी आणि पालकांना राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करता येणार आहे. जेईई-मेन या परीक्षेसाठी आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी पुढे येऊन या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली होती. तशी सोय या परीक्षेवेळी आली नसल्याने पालकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासासंदर्भात खबरदारी घ्यावी लागणार आहे.
हेही वाचा -अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी तीन पर्याय; उदय सामंत यांची माहिती