मुंबई -महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मतदारसंघात लोक प्लेटो आणि डेंग्यूने त्रस्त झाले आहेत. या समस्यांसाठी त्यांना सवाल केला तर ते महिलांशी गुंडगिरीची भाषा करत आहेत, त्यामुळे ते मुंबईचे प्रथम नागरिक की पहिल्या श्रेणीचे गुंड आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौरांवर केली आहे.
मुंबईचे महापौर प्रथम नागरिक आहेत की पहिल्या श्रेणीचे गुंड ? - नवाब मलिक मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सोमवारी त्यांच्याच मतदारसंघातील महिलेशी असभ्य वागले. त्यांच्या पदाला हे शोभण्यासारखं नसून ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे ते मुंबईचे महापौर आहेत की पहिल्या श्रेणीचे गुंड ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे.
महापौरांनी आपल्या प्रथम नागरिकाच्या पदाला डाग लावला असल्याची टीकाही मलिक यांनी केली. मुंबईकरांना ते पहिल्या श्रेणीचा गुंड नाही तर आपला एक सर्वसामान्य महापौर हवा आहे. त्यामुळे त्यांनी प्रथम नागरिक आहेत, की, पहिल्या श्रेणीचे गुंड हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबईत इमारती पडत असून लोकांच्या घरात पाणी शिरले तरी त्यांच्याकडे कोणी पहायला तयार नाही. मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. अशात मुख्यमंत्री यात्रेला गेले आहेत. मुंबईतील जनतेला दुभती गाय समजून शिवसेना, भाजपा आणि महापालिकेतील अधिकारी हे ओरबडून खात आहेत. त्यामुळे मुंबईकरांची अवस्था बिकट बनली आहे. अदानी विजेच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटत असताना त्यासाठी आवाज कोणी देत नाही, यामुळे राजकारणात कोण जिंकेल यापेक्षा आम्ही लोकांचा आवाज बनून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा आमचा संकल्प असल्याचेही मलिक यावेळी म्हणाले.