मुंबई - मावळच्या घटनेमागे भाजपाचा हात होता. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांचा काहीही सहभाग नव्हता. भाजपाच्या काही लोकांनी प्रोत्साहित केले, त्यामुळे हा प्रकार घडला, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, महाराष्ट्र बंद आंदोलन, एफआरपी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते हे विधान आदी विषयांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
हेही वाचा -हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका
भाजपाकडून चिथावणी
लखीमपूर खीरीच्या घटनेशी माजपाकडून मावळच्या घटनेशी तुलना होत आहे, त्यावर पवारांनी आपले मत व्यक्त केले. त्या घटनेचा सरकारशी संबंध नव्हता. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ती कारवाई केली. मात्र येथील कायदा-सुव्यवस्था चिघळावी, म्हणून स्थानिक भाजपा नेत्यांनी लोकांना चिथावणी दिली. त्यामुळे लखीमपूर आणि मावळ या दोन्ही घटनांची तुलना होऊच शकत नाही, असे ते म्हणाले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. लखीमपूरविषयी त्यांना विचारले असता, मावळमध्ये काय घडले, असा सवाल त्यांनी विचारला होता, त्यावर पवार बोलत होते. फडणवीसांच्या मुख्यमंत्री असल्याच्या विधानाचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. लखीमपूरमध्ये शांत चाललेल्या शेतकऱ्यांवर गाडी चालवली जाते. यात केंद्रीय गृह राज्यमंत्र्याचा मुलगा असल्याचे समजते. मात्र केंद्र सरकारही काही करत नाही आणि राज्य सरकारदेखील. गृह राज्यमंत्र्यांनी आपल्या पदापासून दूर व्हायला पाहिजे. राज्य सरकारने याची जबाबदारी घ्यायला हवी.
तपास यंत्रणांचा गैरवापर
केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. राजकीय फायद्यासाठी हे सर्व होत आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी आरोप केले. यामुळे देखमुखांनी राजीनामा दिला. मात्र ज्यांनी आरोप केले, कोठे आहेत, असा सवाल त्यांनी केला. सत्य समोर येईपर्यंत बाजूला होण्याची भूमिका अनिल देशमुखांनी घेतली. अजूनही त्यांच्या घरावर धाडी टाकल्या जात आहेत. पाच-पाच वेळा धाडी टाकून तपास यंत्रणा काय साध्य करू पाहतेय, असा सवाल त्यांनी केला. देशमुख हे सध्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते समोर येऊ शकतील. मात्र सध्या अनिल देशमुख कोठे आहेत याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -मला ईडीची नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेने वेडी ठरवले, पवारांचे टीकास्त्र
'तपास यंत्रणांची नावे समजली'
केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार येण्याआधी देशातील सामान्य जनतेला केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावांचीदेखील माहिती नव्हती. मात्र या तपास यंत्रणांचा केंद्र सरकार एवढा गैरवापर करते आहे, की देशातील प्रत्येक नागरिकाला त्या तपास यंत्रणाची नावे आता माहीत झाली असल्याची टीका पवारांनी यावेळी केली.
'3 बेडरूमच्या खोलीत 18 अधिकाऱ्यांचा तपास'
पवार कुटुंबीयांच्या त्या तीनही मुलींच्या नावावर कोणतेही कारखाने नाहीत. मात्र तरीही केवळ कारवाई करायची आहे म्हणून केंद्रीय तपास यंत्रणेला हाताशी धरून ही कारवाई केली जात आहे. दोन ते तीन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये अजित पवार यांच्या बहिणी राहतात. मात्र या फ्लॅटमध्ये तपासणी करण्यासाठी जवळपास 18 अधिकारी आले. एक ते दोन दिवसापर्यंत ठीक आहे. मात्र सलग सहा दिवस कोणती तपासणी करत आहेत, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. तसेच आदेश येईपर्यंत घरातून बाहेर निघायचे नाही, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले असल्याचे अधिकारी सांगत आहेत, असेही पवार म्हणाले.