मुंबई -आमच्या पक्षातून खासदार झालेले उदयनराजे भोसले हे आज भाजपमध्ये गेले आहेत. परंतु, जेव्हा येथील पोटनिवडणूक होईल, तेव्हा आम्ही उदयनराजे यांचा पराभव करू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत दिली.
हेही वाचा -छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर साताऱ्यात जल्लोष
देशातील सर्व संस्थानिकांना मोदी भाजपमध्ये घेत आहेत, त्यांच्याकडे हजारो एकर जमिनी असून त्या विकण्याची परवानगी देणार आहेत. मात्र, सरकारने राज्यात शिवाजी महाराजांची एक इंच जरी जमीन विकायचा प्रयत्न केला तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.
उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक उदयनराजे हे पूर्वी भाजपमध्ये होते, ते राज्यमंत्री असताना 1999 मध्ये राष्ट्रवादीने त्यांचा पराभव केला होता. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्या मातोश्रींनी पवारांना विनंती करून तिकीट द्यायला लावले आणि ते खासदार झाले. आतापर्यंत उदयनराजे यांनी कायम पक्षाला कमकुवत करण्याचे काम केले. आम्ही ही पोटनिवडणूक पूर्ण ताकदीने लढू, असे म्हणत त्यांनी उदयनराजे दिवसभर आणि रात्रीला काय करत असतात, याची माहिती येथील मतदारांना आहे, त्यामुळे ते त्यांना आपली जागा दाखवतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -अखेर उदयनराजेंनी हाती घेतलं 'कमळ', अमित शाहंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
राज्यातील लोक डरपोक लोकांची साथ देणार नाहीत. आम्ही यापूर्वी उदयनराजे आणि भास्कर जाधव यांना हरवले होते. लोकसभेत काहींनी आमच्या 10 टक्के मतांचे विभाजन केले. राज्यात आता 70 टक्के लोक मोदी आणि फडणवीस यांच्या विरोधात आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही या मतदारांपर्यंत जाऊन आमची ताकद दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.