मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा आज सोमवारी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी देखील आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी यावेळी शपथ घेतल्यानंतर मात्र आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून चार वेळा शपथ घेणारे 'अजित पवार' हे पहिलेच मंत्री ठरले आहेत.
हेही वाचा... मंत्रीपदाच्या काळात एकही मिनिट वाया न घालवता जनतेची कामे करणार - यशोमती ठाकूर
चार वेळा उपमुख्यमंत्री तेही तिन वेगवेगळ्या सरकारमध्ये
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सोमवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार चौथ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यासोबत अजित पवारांच्या नावे तीन वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचाही अनोखा विक्रमही रचला गेला आहे.
आधी काँग्रेस, त्यानंतर भाजप आणि आता शिवसेना अशा तीन विविध पक्षांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम अजित पवारांनी नोंदवला आहे. अवघ्या सव्वा महिन्यांच्या कालावधीत अजित पवारांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. विशेष म्हणजे दोन्ही वेळा अजित पवारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रिपदाची शपथ दिली.
अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ
- अजित पवार उपमुख्यमंत्री नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012( काँग्रेस सोबत)
- अजित पवार उपमुख्यमंत्री डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014( काँग्रेस सोबत)
- उपमुख्यमंत्री अजित पवार 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019( भाजप सोबत)
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 30 डिसेंबर 2019 रोजी चौथ्यांदा शपथ ( शिवसेनेसोबत)
हेही वाचा... उद्धव ठाकरेंनी प्रस्थापितांना डावलत नवख्यांना दिली मंत्रिमंडळात संधी