मुंबई - राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टि्वट करून माहिती दिली. शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात नेण्यात आले.
तपासणीत मूत्राशयाचा आजार जडल्याचे निष्पन्न झाले आहे. 31 मार्चला एन्डोस्कॉपीनंतर शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शरद पवार यांना काल संध्याकाळपासून पोटदुखीचा त्रास होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचा प्रचार करण्यासाठी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे 1 एप्रिलपासून पश्चिम बंगालला जाणार होते. 1 एप्रिल ते 3 एप्रिल असा शरद पवारांचा हा प्रचारदौरा होता. मात्र, रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने त्यांचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत.
2014 मध्येही झाली होती छोटीशी शस्त्रक्रिया -
यापूर्वी शरद पवार यांच्यावर 2014 मध्ये ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शरद पवार दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी असलेल्या बागेत पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हा त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
हेही वाचा -राष्ट्रवादी-भाजपमध्ये काहीतरी शिजतंय..? शरद पवारांसोबत बैठकीबाबत अमित शाह यांचे सूचक वक्तव्य