मुंबई- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil ) वादात सापडले आहेत. सर्व स्तरातून पाटील यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पाटील यांना हे प्रकरण चांगलेच भोवणार आहे. तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही, असे विधान केले. तसेच तुम्ही दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे विधान पाटील यांनी ओबीसी आरक्षण आंदोलनावेळी केले होते. या टीकेला सुप्रिया सुळे यांचे पती यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक झाला आहे. या निषेधार्थ भाजपने बुधवारी नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयाचे मंत्रालयावर धडक मोर्चाचे नियोजन केले होते. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी यात सहभाग घेतला होता. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका करताना, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले.
पाटील काय म्हणाले -मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिल्लीत जाऊन काय केले, हे आम्हाला सांगितले, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली. तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे वादग्रस्त विधान केले होते.
सदानंद सुळेंचे प्रत्युत्तर -हे आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष ! ते सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटत होते, हे स्त्री द्वेषी आहेत. जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. ती गृहिणी आहे. ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी सर्वच महिलांचा अपमान केला आहे, असे सदानंद सुळे म्हणाले.