महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास अडचणीत; रहिवाशांनी पुन्हा उचलून धरली 'ही' मागणी - Mhada

बीडीडी चाळीतील रहिवाशांनी पुन्हा एकदा तिथल्या तिथे संक्रमण शिबीर अर्थात तात्पुरती घरे उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. तर तिथल्या तिथे संक्रमण शिबिरे वा गाळे उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे म्हाडाकडून सांगितले जात आहे. शिवाय एल अँड टीने प्रकल्पातून माघार घेण्याच्या भूमिकेमुळे प्रकल्प अडचणीत आलेला आहे.

नायगाव बीडीडी चाळ
नायगाव बीडीडी चाळ

By

Published : Sep 28, 2020, 4:42 PM IST

मुंबई - नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील कंत्राटदार एल अँड टीने माघार घेतली आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प रखडणार आहे. त्यात आता रहिवाशांनी पुन्हा एकदा तिथल्या तिथे संक्रमण शिबिर अर्थात तात्पुरती घरे उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. तर, म्हाडाकडून मात्र तिथल्या तिथे संक्रमण शिबिरे वा गाळे उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एल अँड टीच्या प्रकल्पातून माघार घेण्याच्या भूमिकेमुळे प्रकल्प अडचणीत आलेला असताना आता ही मागणी उचलून धरली गेल्यास प्रकल्पाच्या अडचणी नक्कीच आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नायगाव बीडीडी चाळीचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून करण्यात येत आहे. तर यासाठी एल अँड टी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात रहिवाशांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. पण रहिवाशांच्या विरोधामुळे पात्रता निश्चिती काही पूर्ण होऊ शकलेली नाही. तर पात्रता निश्चिती पूर्ण न झाल्याने रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करत चाळी पाडून जागा मोकळी करता येत नाही आहे. त्यामुळे एल अँड टी ला काम सुरू करता येणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर एल अँड टी ने या प्रकल्पातून माघार घेतली आहे. आता सरकार, म्हाडा आणि लोकप्रतिनिधी सगळेच एल अँड टी ची मनधरणी करत असताना आता रहिवाशांनी पुन्हा एकदा तिथेच तात्पुरती घरे, संक्रमण शिबिर देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एल अँड टीची मनधरणी करणे शक्य होइल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक आमदार कालिदास कोळंकर यांनी ही तिथल्या तिथेच संक्रमण शिबिर हवे, अशी मागणी असल्याचे 'ईटीव्ही भारत'ला सांगितले आहे. रहिवाशांचा कुठेही पुनर्विकासाला विरोध नाही. उलट त्यांना लवकरात लवकर पुनर्विकास हवा आहे. फक्त त्यांची एकच मागणी आहे की, आमच्या परिसरात मोकळ्या जागा आहेत. त्यावर संक्रमण शिबिर बांधा, आम्हाला दूर वरळीला टाकू नका. त्यांची ही मागणी मान्य केली तर, रहिवासी स्वखुशीने तयार होत पुनर्विकास मार्गी लागेल, असेही कोळंकर यांनी सांगितले आहे. अनेक रहिवाशांचा नोकरी-व्यवसाय याच ठिकाणी आहे. तर, मुलांच्या शाळा देखील याच परिसरात आहे. अशावेळी काही वर्षासाठी असे दूर जाणे रहिवाशांना परवडणारे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

याविषयी स्थानिक रहिवासी आणि बीडीडी संघटनेचे नेते लक्ष्मण देसनेरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही तिथेच संक्रमण शिबिर उपलब्ध करून देण्याची रहिवाशांची मागणी असल्याचे स्पष्ट केले आहे. जिथे कुठे जवळ जागा उपलब्ध होईल, तिथे तात्पुरती घरे रहिवाशांना हवी आहेत. पण त्यामुळे आमचा पुनर्विकासाला विरोध आहे, असे कुठेही नाही. तेव्हा म्हाडा-सरकारने रहिवाशांना सोबत घेत पुनर्विकास मार्गी लावावा, अशी आमची भूमिका आहे, असे देशनेरे यांनी म्हटले आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला याबाबत विचारले असता, त्यांनी ही मागणी सुरुवातीपासून आहे. पण त्यांची ही मागणी मान्य करता येणे शक्य नाही. तशी जागा येथे उपलब्ध नाही. हे त्यांना सांगून समजावून झाले आहे. पण पुन्हा ही मागणी उचलली जाणार असले तर नक्कीच आधीच एल अँड टीच्या भूमिकेमुळे अडचणीत आलेला प्रकल्प आणखी अडचणीत येईल, असेही म्हाडाकडून स्पष्ट केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details