मुंबई- कोरोनाच्या काळात मुंबई महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयाने कौतुकास्पद कामे केली आहेत. त्यामध्ये 500 हुन अधिक कोरोनाग्रस्त गर्भवतीचे सुखरूप बाळंतपण असो किंवा कोरोनाग्रस्त डायलिसिस रुग्णांवरील उपचार या सारखे उल्लेखनीय असे अनेक विक्रम नायर रुग्णालयाने केले आहेत. त्यात आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. ती म्हणजे शुक्रवारी नायर रक्तपेढीत 100 व्या प्लाझ्मा दात्याची नोंद झाली. रुग्णालयात 100 व्या दात्याने प्लाझ्मा दान केला. तर त्याचवेळी रुग्णालयाने 189 प्लाझ्मा कलेक्शन पूर्ण करत 50 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी पूर्ण केली आहे.
मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याबरोबर नायर रुग्णालयाचे रुपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आले. त्याचवेळी येथे गर्भवती कोरोना रुग्ण, नवजात बालक आणि कोरोनाग्रस्त डायलिसिस रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला. तर महत्वाचे म्हणजे आयसीएमआरने मुंबईत प्लाझ्मा थेरपीला परवानगी दिल्यानंतर पहिले प्लाझ्मा मशीन नायरमध्येच कार्यान्वित करण्यात आले. तर प्लाझ्मा क्लेक्शनपासून प्लाझ्मा थेरपीही नायरमध्येच सुरू झाली. त्यातही पहिली प्लाझ्मा थेरपीही नायरमध्येच यशस्वी ठरली. आता यापुढे जात नायर रुग्णालयाच्या रक्तपेढीत 100 व्या दात्याची नोंद झाली आहे, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.