मुंबई -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते व कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. मलिकांना अटक झाल्यापासून त्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मलिकांच्या कोठडी संदर्भात मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
Minister Nawab Malik Arrest Case: मंत्री नवाब मलिकांना धक्का : न्यायालयीन कोठडीतील मुक्काम 20 मे पर्यंत वाढला - मंत्री नवाब मलिकांना धक्का
मनी लाँड्रींग प्रकरणात कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 20 मेपर्यंत वाढ केली आहे.
काय आहे प्रकरण -मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरूध्द ही याचिका होती. पण सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली होती. ज्येष्ठ विधिज्ञ आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी मलिक यांची बाजू मांडली होती. 1993 मध्ये झालेल्या घटनेसाठी 2022 मध्ये अटक कशी केली जाऊ शकते, असा दावा सिब्बल यांनी केला होता. पण न्यायाधीश सुर्यकांत यांनी संबंधित न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करण्यास सांगत आम्ही या टप्प्यावर यात ढवळाढवळ करणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे येथेही मलिकांना दिलासा मिळाला नाही.
गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी दिले पैसे -नवाब मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोप ईडीने केला आहे. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे. तेव्हापासून म्हणजे तब्बल 73 दिवसांपासून ते कोठडीमध्येच आहेत. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून ईडीने गुरूवारी त्यांच्याविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. नवाब मलिकांची तब्येत खालावत असल्याचे मलिकांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. तब्येतीचे कारण देत न्यायालयात मलिकांच्या जामिनाची मागणी करण्यात आली होती.