मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपाचे प्रकरण निवळत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमध्ये गृहमंत्री पदावरून अनिल देशमुखांवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीकडून यावर सावध भूमिका घेत, आपापसात वाद निर्माण करणे योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक मांडली. मात्र, राऊत यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण आहे.
सकारात्मक दृष्टिकोन मिळते -
रोखठोकमध्ये लिहिलेल्या लेखातील काही मुद्द्यांशी आम्ही सहमत आहोत. आमच्या काही चुका झाल्यात त्या मान्य करतो. मात्र, त्यातील सगळेच मान्य नाही. देशमुख गेले पंचवीस वर्षे आमदार आहेत. १८ वर्षे त्यांनी मंत्री पद भूषवले आहे. त्यामुळे अपघाताने मंत्रिपद मिळाले असे म्हणता येणार नाही. गृहमंत्री देशमुख यांच्या काही चुका झाल्या हे मान्य आहे. विनाकारण प्रत्येक प्रश्नांना उत्तर देणे योग्य नाही. सामनामध्ये छापून आलेल्या रोखठोकमधील काही मुद्दे सकारात्मक पद्धतीने घ्यायला हवे. गृहमंत्रीही घेतील आणि पुढे असे काही घडणार नाही, याची काळजी घेतील. कारण प्रत्येक वृत्तपत्रातील काही लेख सकारात्मक दृष्टिकोन देणारे असतात, असे नवाब मलिक म्हणाले.
कमिशनर आणि वाझे प्रकरण -
सचिन वाझे यांना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला. या प्रकरणाला देशमुख यांनी परवानगी दिली होती का? असा प्रश्न नवाब मलिक यांना विचारला असता, कमिशनर आणि वाझे यांच्यामध्ये हे प्रकरण घडले. गृहमंत्र्यांना याची कुणकुणही नव्हती, असे सांगत मलिक यांनी देशमुख यांची पाठराखण केली.
तथ्यहीन वृत्त -
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री यांची बैठक घेतल्याचे वृत्त एका प्रसारमाध्यमात प्रकाशित झाले आहे. याबाबत राज्यात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे बोलले जात आहे. नवाब मलिक यांनीही सर्व वृत्त फेटाळून लावली. वृत्त तथ्यहीन असून अफवेला केवळ हवा देणे योग्य नाही. राज्यात महाविकास आघाडी भक्कम आहे, असे मलिक यांनी स्पष्ट केले.
भाजपकडे मुद्दे नाहीत -
होळी साजरीकरणावर घातलेल्या निर्बंधांवरून भाजपाने सरकारवर टीका केली आहे. होळी घरासमोर पेटवायची नाही, तर काय घरात पेटवायची का, असा सवाल भाजपच्या काही नेत्यांनी केला आहे. ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून फक्त हिंदूंच्या सणांना विरोध का करत आहे, असा आरोप देखील केला आहे. भाजपाकडे सध्या भावनेच्या राजकारणाशिवाय दुसरे काही मुद्दे राहिलेले नाहीत. गणपती, बकरी ईद, दिवाळी, ख्रिसमस आदी सण साध्यापणाने साजरे केले. मुस्लिमानी देखील घरी नमाज पठण केले. आजही करत आहेत. मात्र, भाजपकडे सध्या कोणताही मुद्दा राहिला नसल्याने भावनिकतेचे राजकारण करत आहेत, असा टोला लगावला.
काय म्हणालेत राऊत -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात सापडले. विरोधकांनी यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील देशमुख यांच्यावर रोखठोक या सदरातून देशमुख यांना खडेबोल सुनावले आहेत. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पद स्वीकारण्यास नकार दिल्याने ते अपघाताने देशमुख यांच्याकडे आले, असा गौप्यस्फोट केला आहे. गृहमंत्री पदाची प्रतिष्ठा व रुबाब आहे. दशहत आहे. आर आर पाटील यांच्या गृहमंत्री पदाची कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम आहे. अशातच संशय ही वाढतो आहे. देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्यांनी कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशी यांचे जाहीर आदेश देणे बरे नव्हे. 'सौ सोनार की एक लोहार की' असे वर्तन असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त सॅल्युट घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपानातून निर्माण होतो, हे विसरून कसे चालेल, असा सवालही रोखठोक मध्ये विचारण्यात आला आहे.
हेही वाचा -'पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त 'सॅल्यूट' घेण्यासाठी नसते', खासदार राऊतांचा सरकारला घरचा आहेर