मुंबई - वक्फ बोर्डाने केलेल्या सात एफआयरनुसार ईडीने आज सात ठिकाणी काही व्यक्तींच्या घरी कारवाई केली, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. वक्फ कार्यालयावर ईडीने छापेमारी केल्याच्या वृत्तावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला, तसेच बदनामीसाठी अफवा पसरवल्या जात असून कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असा इशारा मलिक यांनी देताना राज्यातील नोंदणीकृत वक्फ बोर्डाच्या ३० हजार संलग्नित संस्थांची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी केली.
हेही वाचा -Nawab Malik on ETV Bharat : अन्यायाविरोधात लढण्याची हीच ती योग्य वेळ - नवाब मलिक
बनावट खात्यांचा वापर
ईडीने वक्फ बोर्डावर कारवाई केली असून याचे धागे दोरे नवाब मलिक यांच्या घरापर्यंत पोहोचणार असल्याचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र, ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्ट संदर्भात कारवाई झाली आहे. पुण्यात एमआयडीसीने 5 हेक्टर 51 आर जमीन अधिग्रहित करून ती भूसंपादन अधिकाऱ्याकडे जमा केली. भूसंपदान अधिकाऱ्याने इम्तियाज हुसेन आणि इतर ट्रस्टी जे स्वत:ला क्लेम करत होते, त्यांना सात कोटी 76 लाख 98 हजार 250 रुपये भूसंपदनाची रक्कम दिली. मात्र, माझ्याकडील कागदपत्रानुसार 9 कोटी 64 लाख 42 हजार 500 रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे भूसंपादनाचे जमा झाल्याचा नमुद आहे. बनावट कागदपत्र तयार करून सात कोटी 76 लाख 98 हजार 250 रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग केल्याचा प्रकार 2020 मध्ये उघडकीस आल्याचे मलिक म्हणाले.
पाच जणांना अटक
वक्फ बोर्डाला यासंदर्भात माहिती दिल्यानंतर एनओसी दाखल केली. सीईओ आहेत शेख यांनी पुणे विभागाचे अधिकारी खुसरू यांच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2021 पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. दरम्यान पाच लोकांना अटक झाली. चांद रमजान मुलाणी, इम्तियाज मुहमद हुसेन शेख, कलीम सय्यद, राजगुरू आणि कांबळे, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास पुणे पोलिसांनी टाळाटाळ केली होती, मात्र पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंद दाखल करण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले.
सात वक्फ बोर्डाच्याविरोधात एफआयआर
अल्पसंख्याक विभागाचे खाते माझ्याकडे आल्यानंतर वक्फ बोर्डात क्लिन अप कार्यक्रम सुरू केला आहे. क्लिन अपमध्ये सरकारी अधिकारी आणि जुने पदाधिकारी यांना काढण्यात आले. पारदर्शक कारभार करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीवर भर दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत, सीईओंना कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार वक्फ बोर्डाने 7 तक्रारी दाखल केल्याचे मलिक यांनी सांगितले. ताबूत एंडोमेंट ट्रस्ट पुणे, जुम्मा मस्जिद, बदलापूर ठाणे, दर्गा मस्जिद आष्टी बीड, मस्जिद देवी निमगाव तालुका आष्टी बीड, दुर्गा बुराणशाह ईदगाह जिंतूर रोड परभणी, मस्जिद छोटा पंचतन परतपूर जिल्हा जालना, दर्गा नुरुल खुदा मस्जिद कबरस्तान दिल्ली गेट औरंगाबाद या सात एफआयर नोंदवल्याचेही ते म्हणाले. आष्टीच्या प्रकरणात एक उपजिल्हाधिकारी शेळके याला अटक झाली आहे. आता ईडीने वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या 30 हजार संस्थांची चौकशी करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.
बदनामी करू नये
राज्य सरकारच्या क्लिन अप अभियानाला ईडीचे सहकार्य मिळत आहे, याचे स्वागत करतो. लखनऊ शिया बोर्डासाठी शिया समुदायाने पंतप्रधान मोदींना पत्र दिले होते. ते प्रकरण सीबीआयला वर्ग केले होते. वसीम राझा यांची चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली. तसेच, ईडीला चौकशीसाठी सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, बदनामी करण्याचा डाव असल्यास ते चूक करत आहेत. हेतू प्रामाणिक असेल तर आम्ही सहकार्य करू, असेही मलिक म्हणाले.
हेही वाचा -गोरेगावमध्ये ६ कोटीच्या ड्रग्जसह एका नायजेरियन तस्कराला अटक