मुंबई - देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले. कालपर्यंत वाटत होते असंख्य हुतात्मे, स्वातंत्र्यवीर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, इंदिरा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यासह मेहनत करून घामाचे शिंपण करणारे लोक, शास्त्रज्ञ, सैन्य यांच्यामुळे (BJP special micro-donation campaign) आपला देश बलाढ्य होत जाईल. पण, हे सर्व कुचकामी असून भाजपच्या (Prime Minister Narendra Modi, made donations) देणगीच्या पावत्या फाडल्याने देश मजबूत होईल. यामुळे देश आणखी बलाढ्य खरंच होईल? लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर देणगी मोहिमेचे स्वागत करायला हरकत नाही!
भारतीय जनता पक्षाने जनतेकडे देणगीसाठी आवाहन केले आहे
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपकडून देणगी हे अभियान सुरू करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा वगैरेंनी पक्षाला प्रत्येकी एक हजार रुपयांची देणगी देऊन पैसे दिल्याची पावती सोशल मीडियावर झळकवली आहे. मोदी-शहांनी देणगीची पावती समाज माध्यमांवर फडकवताच पक्षाचे इतर नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी वगैरे बड्या मंडळींनीही पक्षनिधीच्या पावत्या फाडल्या. पक्षासाठी अथवा राजकीय कार्यासाठी देणग्या घेणे यात अजिबात गैर नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक चळवळींत लोकांच्या देणग्यांचेच पाठबळ मिळत राहिले, पण इतर सर्व आणि भाजपमध्ये फरक आहे. भाजपावर देणग्या गोळा करून चूल पेटविण्याची वेळ अद्याप तरी आलेली नाही. भाजपा हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत राजकीय पक्ष असावा, असा चिमटा शिवसेनेनं काढलाय.
भाजपचा जमाखर्च, नफा-तोटा खाते आता सगळ्यांसमोर आहे
हिंदुत्वाच्या मुद्यावर महाराष्ट्रात शिवसेनेशी युती झाल्यावर, अयोध्या आंदोलनाने जोर धरल्यावर भाजप लोकांपर्यंत पोहोचला. भाजप त्याआधी काय होता हे काय कुणाला माहीत नाही? ते काही असले तरी भाजपचे नाव श्रीमंतांच्या यादीत झळकले, याचे कुणाला दुःख होण्याचे कारण नाही. तरीही भारतीय जनता पक्षाने आता लोकांकडून पाच रुपयांपासून, 50, 100, 500 व एक हजार रुपयांपर्यंत देणग्या घेण्याचे मायाजाल टाकले आहे. म्हणजे आपला पक्ष लोक वर्गणीवर उभा आहे हे त्यांना दाखवायचे आहे, पण भाजपने (2019-20) सालात (3,623.28) कोटी रुपयांची 'संपत्ती' जाहीर केली आहे. (Prime Minister Narendra Modi Made Donations) भाजपचा जमाखर्च, नफा-तोटा खाते आता सगळ्यांसमोर आहे. तसेच इतर पक्षांचेही आहे. (2014)पासून कोणाची बँक खाती कशी तरारून फुगली हे काही लपून राहिलेले नाही. कधी काळी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत हीच बरकत होती. भारतीय जनता पक्षाला पैसा जमा करण्याची कला अवगत आहे. तशी राजकीय विरोधकांच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या कलांतही त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे.
इतरांना द्याल तर याद राखा अशा गुप्त मोहिमा भाजपने आघल्या
नोटाबंदी काळात त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असेच होते, स्वपक्षाच्या बड्या देणगीदारांना आधीच नोटाबंदीची माहिती देऊन त्यांना सुरक्षित केले, पण विरोधकांच्या हातातील 'पुंजी' कुजवून अडचणी याव्यात हाच त्यांचा उदात्त हेतू होता. विरोधी पक्षांच्या हाती निवडणुका लढण्यासाठी फार साधने राहू नयेत व त्यांच्यावर भिकेची वेळ यावी अशी तरतूद गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, तेलगू देसम, शिवसेना, काँग्रेस या पक्षांच्या देणगीदारांना या ना त्या मार्गाने त्रास द्यायचा व फक्त भाजपला पैसे द्या, इतरांना द्याल तर याद राखा अशा गुप्त मोहिमा राबविण्यात आल्याचे खुलेपणाने बोलले जात आहे. त्यामुळे 'भाजप' हा अल्पावधीत अतिश्रीमंत पक्ष झाला व त्यांचा थाट-माट-तोरा वाढला याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आजही उत्तर प्रदेशात जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसतशा आयकर विभागाच्या धाडींचा जोर वाढू लागला. या धाडींमागे एक राजकीय सुसूत्रता आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मैदानातील एक प्रमुख खेळाडू बहनजी मायावती या स्वतःच तंबूत परतल्या आहेत. याचे रहस्यही सगळे जण जाणून आहेत. यामागे कोण व का? हे उघड आहे.