मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच अभिभाषण अर्धवट सोडले. यावरून सत्ताधारी चांगलेच संतापलेले आहेत. राज्यपालांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई यांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही. या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच, राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करू, असेही ते म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नाना पटोले बोलत होते.
'राज्यपालांना परत पाठवण्यात संदर्भात ठराव आणणार'
विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले, हे राज्यपालपदाला शोभणारे नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करु, शिवाजी महाराजांचा जयघोष राज्यपाल कोश्यारी व भारतीय जनता पक्षाला आवडो वा ना आवडो जयजयकार कोणीही थांबवू शकत नाही. शिवाजी महाराज व महात्मा फुले तसेच सावित्रीमाईंबद्दल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकार विरोधी काम राज्यपाल करत असून राज्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर राज्यपाल आडकाठी भूमिका घेत आहे. या संदर्भात ठराव अतिशय महत्त्वाचा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.