मुंबई - राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागला ( Maharashtra Nagarpanchayat Election Result 2022 ) आहे. महाविकास आघाडीची यात सरशी झाली ( Mahavikas Aghadi Won Nagarpanchayat Election ) आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपला दूर सारत जोरदार मुसंडी मारली. शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी या निकालाचे विश्लेषण करताना भाजपवर टीकास्त्र ( Deepak Kesarkar Criticizes Bjp ) सोडले. आर्थिक बळाचा वापर करून काही ठिकाणच्या जागा भाजपने जिंकल्या आहेत, असा आरोप केसरकर यांनी केला. सिंधुदुर्गातील राणे कुटुंबाच्या वर्चस्वावर ही त्यांनी शाब्दिक हल्ला चढवला. तसेच स्वबळावर निवडणुका लढवणाऱ्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आजच्या निकालाचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही केसरकर यांनी दिला. ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.
भाजपचा टिकावच लागला नाही
राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठे यश मिळाले आहे. जनतेचा महाविकास आघाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याला मिळालेला पाठिंबा याचे प्रतिबिंब आजच्या निकालातून स्पष्ट दिसत आहे. आजच्या निकालाची विरोधकांशी तुलना होऊ शकत नाही, असा दावा शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला. सर्वच ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढली असती, तर अधिक चांगले निकाल आले असते. हजार, दीड हजार मते असलेल्या नगर पंचायतीमध्ये भाजपकडून आर्थिक व्यवहार करून जागा निवडून आणल्या आहेत. परंतु, मोठ्या नगरपंचायतमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जागा निवडून आल्या आहेत. भाजपचा तेथे टिकावच लागला नाही, असेही केसरकर म्हणाले.
राणे बोध घेतील
सिंधुदुर्गातील ज्या पंचायतीमध्ये दीड ते दोन हजार मत आहेत, ती पैसे देऊन विकत घेतलेला विजय आहे. मात्र, त्याला विजय म्हणता येणार नाही. ज्या नगरपंचायती हजारोंच्या संख्येने मत आहेत, तेथील जनतेने नारायण राणे आणि परिवाराला साफ धुडकावून लावला आहे. वैभव नाईक, संदेश पारकर यांनी चांगली भूमिका निभावली. एकंदरीत सिंधुदुर्गातील हवा राणेंच्या विरोधात असल्याचे आजच्या निकालातून सिद्ध होते. शिवाय पैशांचा वापर करून निवडणूक जिंकता येणार नाही, हे सुद्धा स्पष्ट झालेले आहे. आजच्या निकालातून राणे बोध घेतील, असा चिमटाही केसरकर यांनी यावेळी काढला. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.