मुंबई - महापालिकेने पाणी कपात लागू केली आहे. त्याचा फटका आता महापालिकेच्या मुख्यालयालाही बसला आहे. पालिका मुख्यालयाला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने पालिकेवर टँकरने पाणी मागवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ज्यांच्या कार्यालयात पाणी नाही ते मुंबईकरांना पाणी कुठून देणार, असा टोला पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
पालिकेचे मुख्यालय असलेल्या ‘ए’ विभागात पाणीटंचाई असल्याची तक्रार या भागातील शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांनी पालिका आयुक्तांकडे ६ महिन्यांपूर्वीच केली होती. तसेच पालिका सभागृहात हा प्रश्न त्यांनी सातत्याने मांडला होता. यावेळी प्रशासनाकडून तांत्रिक कारणांमुळे पाणीटंचाई होत असल्याचे उत्तर देण्यात आले होते. या विभागातच पालिका मुख्यालय असून तेथे पाणीटंचाई भेडसावत असल्याचे उघडकीस आल्यामुळे प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.
पाणी कपातीची माहिती देताना पालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा पालिका मुख्यालयाच्या मुख्य आणि विस्तारीत अशा २ इमारती असून तेथे विविध विभागांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. पालिकेने मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये पाणीकपात केल्यापासून या दोन्ही इमारतींना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे ‘ए’ विभागातील फिलिंग पाँईटवरून पालिकेच्याच टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. मागील ३ ते ४ महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून रोज २ ते ३ टँकर मागवावे लागत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, गुरुवारी दुपारनंतर काही विभागातल्या शौचालयात पाणीच नसल्याचे समोर आले. त्यामुळे कर्मचारी तसेच मुख्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.
पाणीपुरवठ्या बाबत पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्याशी संपर्क साधला असता, मुंबईत आज अनेक ठिकाणी पाणी नाही. मी प्रतिनिधित्व करत असलेल्या सायन विभागात आज पाणी आलेले नाही. पालिका मुख्यालयात महापौर, आयुक्त बसतात त्या मुख्यालयातच पाणी नाही. पालिका मुख्यालयाला टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. आज शौचालयांमध्ये पाणी नसल्याने शौचालयाचा वापर करू नये, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. ही प्रशासनाची निष्क्रियता आहे, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रसचे सरकार असताना पिंजाळ गारगाई हे प्रकल्प लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ते प्रकल्प अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे. दोन वर्षांपूर्वीपासून पालिकेच्या 'एच' ईस्ट आणि 'टी' या दोन वॉर्डमध्ये सत्ताधाऱ्यांनी २४ तास पाणी देण्याचा पायलट प्रोजेक्ट राबवला, त्या वॉर्डमध्ये पाणी नाही, ज्यांच्या कार्यालयात पाणी नाही ते मुंबईकरांना पाणी कुठून देणार असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.