नागपूर - मुंबई महानगर पालिकेतील गेल्या ३५ वर्षांची शिवसेनेची सत्ता आहे. ती यावेळी भारतीय जनता पक्ष उलथून लावणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. त्याला आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. संकटाच्या काळात प्रत्येकवेळी शिवसेनाच मुंबईकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिली आहे. त्यामुळे मुंबईकर सुज्ञ आहेत. आम्हाला निवडणुकीच्या निकालाची चिंता नसल्याचा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांचा आशिर्वाद नेमका कुणाला
भारतीय जनता पक्षाकडून जनआशिर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सध्या मुंबईत आहे. काल नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर बाळासाहेबांचा आशिर्वाद माझ्यासोबत असल्याचा दावा केला होता. एवढेच नाही तर आगामी महानगरपालिका निवडणुकीतही बाळासाहेबांचा आशीर्वाद भाजपसोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी वरिल प्रतिउत्तर दिले आहे.
'पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार'
बाळासाहेब हे शिवसैनिकांचे दैवत आहे. त्यांच्याच आशीर्वादाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा कारभार अतिशय उत्तम चालवत आहेत. दरम्यान, देशाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कोण काय म्हणतो याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचेही शिंदे म्हणाले आहेत.
शिवसेनेला डिवचण्याचा पुरेपूर प्रयत्न
पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अजून सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी शिल्लक असला, तरी राजकारण मात्र आत्तापासूनच तापायला सुरुवात झाली आहे. नुकतेच नारायण राणे केंद्रीय मंत्री झालेले आहेत. त्यानंतर ते पुर्ण ताकतीने मुंबई महापालिका जिंकण्याच्या तयारीला लागलेले दिसत आहेत. तसेच, राणे यांनी नुकतेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थाळावर जावून त्यांना वंदन केले आहे. आता ते मुंबई जिंकणारच असा दावा ते करत आहेत. हा शिवसेनेला डिवचण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.