मुंबई - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासात लगेचच आरे मधील मेट्रो-3 च्या कामाला पुन्हा एकदा गती देण्याचे आदेश दिले. यामुळे पुन्हा एकदा आरे जंगलात वादाचा वाणवा पेटला आहे. नवीन सरकारच्या या निर्णयाविरोधात आज ( 3 जुलै ) आरे येथील पिकनिक पॉईंट जवळ महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी संघटना व राजकीय पक्षांनी एक येत या निर्णयाला विरोध केला ( Aarey Forest Protest ) आहे.
"मी त्या 29 जणांपैकी एक" -यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना तरुण पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणाले की, "आम्ही इथं एखाद्या पक्षाला विरोध करण्यासाठी आलेलो नाही. आपण सर्वांनीच पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. इथं जी काही लोक आलेत, ती कोणत्याही पक्षाला विरोध करण्यासाठी नाही. तर, आरेच जंगल वाचवण्यासाठी आलेले आहेत. मागच्या वेळी ज्या 29 जणांना अटक करण्यात आली होती. मी देखील त्यातलाच एक आहे. माझ्यावर प्रचंड प्रेशर आहे. मला सगळी लोक सांगतात की या आंदोलनात सहभागी होऊ नको. तरीसुद्धा मी इथं आलोय. कारण, विषय पर्यावरणाचा आहे. आणि इथे राहणाऱ्या आदिवासींच्या प्रश्नांचा आहे."
आरे मुंबईचं फुफ्फुस -आरेच्या या 1,800 एकर वनक्षेत्राची 'मुंबईचे फुफ्फुस' म्हणून ओळख आहे. आरेच्या जंगलात बिबट्यांशिवाय जवळपास 300 प्रजातींचे प्राणी आढळतात. हे उपनगर गोरेगाव येथे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडलेले आहे. इथं मुंबईच्या कानाकोपऱ्यातील लोक शनिवार रविवारी स्वच्छ प्रदूषण मुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या मते, जंगले केवळ शहरातील लोकांना ताजी हवा देत नाहीत. तर वन्यजीवांसाठी एक प्रमुख अधिवास देखील आहेत. त्यापैकी काही स्थानिक आहेत. या जंगलात सुमारे पाच लाख झाडे असून अनेक नद्या आणि तलाव येथून जातात.
"...तर पहिली वीट मी लावेन" -पुढे बोलताना इथले पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणाले की, "आमच्या विरोधात एक अफवा देखील पसरवली जात आहे की, आम्ही पूर्ण मेट्रो प्रकल्पाचे विरोधात आहोत. ही अतिशय चुकीची माहिती आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. पण, हा विकास जर झाड तोडून, पर्यावरणाचा ऱ्हास करून होणार असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. याच मेट्रो कारशेडला कांजूरमार्गचा देखील पर्याय देण्यात आला आहे. तुम्ही कारशेड आरे मधून कांजूरमार्गाला न्या तिथं कारशेडसाठी पहिली वीट मी माझ्या हाताने लावेल. पण, तुम्ही जर आरे मध्येच कारशेड बांधणार असाल तर त्याला आमचा विरोध हा कायम असेल."