मुंबई - मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण ( Cement concreting of roads in Mumbai ) करून सुधारणा होत आहेत. याचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी आज (शनिवार) घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. दरम्यान, मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई खड्डे मुक्त होईल, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने डॉ. इकबाल सिंह चहल यांनी यावेळी माहिती देताना व्यक्त केला.
९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण -मुंबई महानगरातील रस्ते सुधारणा उपाययोजनांबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी बैठकीत सादरीकरण केले. मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते बांधणी केली जात आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते देखील सुधारण्याच्या दृष्टीने सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला आहे. कारण सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परीरक्षणाचा खर्च देखील कमी होतो. यंदा म्हणजे सन २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण काम होत आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे. तर आणखी तब्बल ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर उर्वरित ४२३.५१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण देखील पुढच्याच वर्षी म्हणजे २०२३-२०२४ मध्ये हाती घेण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे. म्हणजेच पुढील दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, याचा महानगरपालिका प्रशासनाला विश्वास आहे, असे आयुक्तांनी बैठकीत नमूद केले. यापुढे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करताना ठराविक अंतरावर पाण्याचा निचरा करणारे शोषखड्डे देखील तयार केले जाणार आहेत, जेणेकरून पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवणार नाही. सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांच्या नवीन निविदांमध्ये त्यादृष्टीने अटींचा समावेश देखील करण्यात आला आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
हेही वाचा -Uddhav Thackeray Interview : लवकरच उद्धव ठाकरेंची सडेतोड मुलाखत; बंडखोरांवर साधणार निशाणा!