मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( NCP president Sharad Pawar ) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) आणि माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane ) या केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दोन्ही मुलांवर आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे आणि निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून अडचणीत आले असून राणे बंधुंच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आजाद मैदान पोलीस करत आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर निशाणा साधताना राणे बंधूंनी पवारांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला. असा संबंध जोडल्यामुळे राणे बंधूंविरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ही तक्रार दिली आहे.
राणे बंधूविरोधात तक्रार काय
मुस्लिम तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचा डाव असल्याचा आरोप एफआयआर मध्ये केला आहे. आमदार नितेश राणे यांनी आझाद मैदानावर बोलताना नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत? अशी विचारणा शरद पवारांना केली होती. वास्तविक नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे. पण अनिल देशमुखांचा मराठा म्हणून राजीनामा घेतला पण नवाब मलिक मुस्लिम असल्याकारणाने त्यांचा राजीनामा घेतला नाही असे नितेश राणे यांनी म्हटले होते. नितेश राणे हे हिंदू-मुस्लिम गटात तेढ द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सुरज चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे. नितेश राणे आणि निलेश राणे हे बंधू जाणीवपूर्वक कट रचून समाजात प्रक्षोभक भाष्य करून तेढ निर्माण करत दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने शरद पवारांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून अब्रुनुकसानी करत आहेत. दाऊदशी संबंध जोडल्याने शरद पवार यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असेही सुरज चव्हाण यांनी तक्रारीत नमूद केले आहे