मुंबई -मुंबईतील सर्व पोलीस कार्यालयांमध्ये मराठीतून कामकाज (Work in Marathi in Police Offices) करण्याचे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar) यांनी दिले आहेत. कार्यालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा सर्वाधिक उपयोग करण्यात यावा तसेच एफआयआर, आरोपपत्र आणि अहवाल हा मराठीतूनच तयार करण्यात यावा, असे आदेश पोलीस आयुक्तांनी मुंबईतील सर्व पोलीस कार्यालयांना दिले आहेत. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त यांनी हे निर्देश दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
काय दिले निर्देश- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये पोलीस आयुक्तांनी सर्व कामकाज मराठीतच करणार असल्याचे सांगितले आहे. विवेक फणसळकर यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंदर्भातील कडक निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्तांना पाठवला जाणारा रिपोर्ट हा मराठीत असावा. नॉन मराठी अधिकाऱ्यांनी मराठीत संवाद साधावा. मराठी भाषा व्यवस्थित शिकून घ्यावी. सर्व अहवाल मराठीत पाठवावे, असे निर्देशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.