मुंबई - आतापर्यंत ५६ लोकांचे जवाब नोंदवले आहेत. सुशांतसिंह राजपूत याच्या मोबाईल व लॅपटॉपमधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. १५ जूनला फॉरेन्सिक टीम सुशांतसिंहच्या घरातून काही पुरावे घेऊन गेली होती. सुशांतचे आर्थिक व्यवहार तपासले आहेत. याप्रकरणी तपासात कोणालाही सूट देण्यात आली नसून तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग तपासादरम्यान १६ जून रोजी सुशांतच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात सुशांतच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याने कोणावरही संशय घेतलेला नाही. सुशांतच्या प्रकृती ठिक नसल्याने उपचार सुरू होते. व्यावसायिक स्पर्धेमुळे सुशांतने कदाचित आत्महत्या केली असावी, असे त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले होते. मुंबई पोलिसांचा तपास अजूनही सुरू असून, आम्ही कुठल्याही निर्णयावर अजून आलेलो नसल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.
१३ जून व १४ जून या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासले असून, त्यावेळी सुशांतसोबत राहणाऱ्या व्यक्तींबद्दल आम्ही माहिती घेतली असून, या दिवशी कुठली पार्टी झाली होती का? याचे पुरावे मिळाले नसल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
बिहार पोलीस मुंबईत आले आहेत. मात्र, कायदा याबाबत स्पष्ट आहे की, राज्याच्या बाहेर नोंदवण्यात आलेला गुन्हा हा तत्वावर घेतला जातो. बिहार पोलीस कुठल्या तत्वावर मुंबईत तपास करत आहेत? याबद्दल आम्ही कायदेशीर सल्ला घेत असल्याचे मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितले. कुठल्याही व्यक्तीला क्वारंटाइन करण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे, पोलिसांना नाही. बिहार पोलिसांच्या अधिकाऱ्याला महानगरपालिकेकडून क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.
सुशांतसिंह हा गुगलवर सारखा आपले नाव शोधत असायचा, सुशांतवर बायपोलर डिसऑर्डरचे उपचार सुरू होते. दिशा सालियन आत्महत्येशी त्याचे नाव जोडले गेल्याने सुशांतसिंह तणावात गेल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. सुशांतच्या बँक खात्यात १८ कोटी रुपये होते. ज्यापैकी १४ कोटी काढण्यात आले होते, आताही सुशांतच्या बँक खात्यात ४ कोटीहून अधिक रक्कम शिल्लक असून, रियाच्या कुठल्याही बँक खात्यावर सुशांतच्या खात्यातून पैसे गेलेले नाहीत, असे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्पष्ट केले आहे.